डोंबिवलीत गुन्हेगारांचं कंबरडं मोडणारी कारवाई, 7 रिक्षांसह दुचाक्या हस्तगत

डोंबिवलीत गुन्हेगारांचं कंबरडं मोडणारी कारवाई, 7 रिक्षांसह दुचाक्या हस्तगत

कोर्टाने या आरोपींना अधिक चौकशीकरिता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

  • Share this:

डोंबिवली, 19 ऑक्टोबर : डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून रूजू झाल्यापासून जय मोरे यांनी गुंड-गुन्हेगारांचे कंबरडं मोडून काढण्याचा सपाटा लावला आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या एसीपी मोरे आणि वपोनि सुरेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली पोलिसांच्या पथकाने तिघा सराईत वाहनचोरांकडून 7 रिक्षा आणि 2 दुचाक्या असा तब्बल 7 लाख 30 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून चोरलेली ही सर्व वाहने विकण्याचा मनसुबा उधळून लावला.

शंतनू सुमेध काळे (22) आणि विशाल सोमाजी इंगोले (24) हे दोघेही बदलापूर पाईपलाईन रोडला असलेल्या कोळेगावचे रहिवासी आहेत. तर किरण राजू भोसले (20) हा रिक्षाचालक आशण कल्याण-कसारा रेल्वे मार्गावरील आंबिवली स्टेशन जवळच्या बनेलीगावचा रहिवासी आहे. या तिघांना शनिवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास बेड्या ठोकल्यानंतर रविवारी कल्याण कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने या चोरट्यांना अधिक चौकशीकरिता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

चोळगावात राहणारे राजू मनोहर चौधरी (42) यांची रिक्षा चोरीस गेली होती. या संदर्भात 8 ऑक्टोबर रोजी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपींचा शोध सुरू असतानाच पेट्रोलिंगदरम्यान फौजदार दिपक दाभाडे, फौजदार संदीप एगडे, उगाडे, शंकर निवळे, विशाल वाघ, सोमनाथ पिचड, वैजीनाथ रावखंडे, दिलीप कोती यांनी सुनिलनगरमधील राज कमल सोसायटीच्या मागे एका रिक्षामध्ये दोन इसम संशयास्पदरित्या बसल्याचे आढळून आले.

चौकशीदरम्यान त्यांच्याकडील रिक्षा चोळगावातील राजू चौधरी यांच्या मालकीची असल्याचे समोर आले. शंतनू काळे आणि विशाल इंगोले या दुकलीकडून आणखी एक गौप्यस्फोट झाल्यानंतर पोलिसांनी त्यांचा साथीदार किरण भोसले याच्या मुसक्या आवळल्या. या तिघांनी मिळून डोंबिवलीसह नवी मुंबईतील तुर्फे, कोपरखैरणे, वाशी सेक्टर - 9, सानपाडा गाव, डायघर, मुंब्रा, मानपाडा भागातून वाहने चोरल्याची कबूली दिली. या त्रिकुटाने विविध ठिकाणी लपवून ठेवलेल्या 7 रिक्षा व 2 दुचाक्याही पोलिसांनी हस्तगत केल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त जय मोरे यांनी सांगितलं आहे.

Published by: Akshay Shitole
First published: October 19, 2020, 10:47 PM IST
Tags: dombivali

ताज्या बातम्या