आरोग्य केंद्रात डॉक्टर गायब, परिचारिकेनं केली 168 बाळंतपणं!

आरोग्य केंद्रात डॉक्टर गायब, परिचारिकेनं केली 168 बाळंतपणं!

. गेल्या काही वर्षांपासून पितळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारीच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

  • Share this:

शैलेश पालकर, प्रतिनिधी

पोलादपूर, 30 नोव्हेंबर : रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाअंतर्गत पोलादपूर तालुक्यातील पितळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रामधील परिचारिका आर. आर. नाईक यांनी वैद्यकीय अधिकारी नसल्याने जुलै 2017 पासून आजतागायत 168 महिलांची बाळंतपणं केली असल्याची माहिती उघडकीस आली आहे.

गेल्या काही वर्षांपासून पितळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारीच नसल्यानं परिचारिका नाईक तथा राऊतबाई यांनाच काम सांभाळावे लागले. पोलादपूर तालुक्यातील बोरावळे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील चाळीचा कोंड येथील नम्रता विनोद कदम या महिलेचे पहिले बाळंतपण असल्यानं तिचा पती विनोद कदम आणि सासु-सासरे यांनी आज सोमवारी पहाटे पाच साडेपाच वाजण्याच्या सुमारास तिला पितळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रसुतीसाठी आणले.

या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सोपान वालपकर हे शनिवारी साप्ताहिक सुट्टीवर गेले ते परत आलेच नसल्यानं नम्रता कदम हिची पहिली प्रसुती सुखरुप होण्याबाबत कदम कुटुंबीयांना चिंता वाटू लागली.

मात्र, त्यांना येथे असलेल्या परिचारिका आर.आर. नाईक तथा राऊतबाई यांनी अनेक गर्भवती महिलांची प्रसुती सुखरूप केल्याची माहिती त्यांना मिळाली आणि शुक्रवारी सायंकाळी साप्ताहिक सुट्टीवर गेलेल्या परिचारिका नाईक या सोमवारी हजर होण्याच्या दृष्टीने रविवारी रात्रीच अलिबाग तालुक्यातील त्यांच्या गावातून पितळवाडी येथे आल्या असल्याची माहिती मिळाली.

कदम कुटुंबीयांनी परिचारिका नाईक तथा राऊतबाईंना विनंती केली आणि त्यांनी त्यांच्या नेहमीच्या अनुभवातून नम्रता कदम हिची प्रसूती सुखरूपपणे केली.

आतापर्यंत परिचारिका आर.आर. नाईक तथा राऊतबाई यांनी तब्बल 168 बाळंतपणं केल्याची माहिती दिली.

यावेळी बाळ आणि बाळंतीण सुखरुप असल्याने आनंद वाटत असला तरी पोलादपूर सारख्या ग्रामीण दुर्गम भागांमध्ये असलेल्या या पितळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर असणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया नम्रताचे सासरे कदम यांनी दिली.

====================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 30, 2019 06:49 PM IST

ताज्या बातम्या