पंढरपूर, 07 मार्च : दिल्लीमध्ये झालेली दंगल ही पूर्वनियोजित होती आणि ही एक दंगल झाली म्हणून सगळं काही संपलं असं मी मानत नाही. अजून दंगल झाली तर आश्चर्य वाटून घेऊ नका, अशी भीती बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. तसंच सैन्याचे 25 लाख युनिफॉर्म विकले गेले असून देशासाठी हे धोकादायक आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
प्रकाश आंबेडकर हे पंढरपूरच्या दौऱ्यावर होते. पंढरपूरमध्ये नाभिक समाजाचं अधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी दिल्लीतील हिंसाचाराबद्दल आपली भूमिका मांडली.
दिल्लीतील हिंसाचार पूर्वनियोजित -प्रकाश आंबेडकर pic.twitter.com/RRfaMj78cv
— News18Lokmat (@News18lokmat) March 7, 2020
'दिल्लीत जेव्हा हिंसाचार उफाळला हा पूर्वनियोजित होता. अचानकपणे दंगल उसळली आणि काही दिवसांनी लगेच थांबली. हे पूर्वनियोजित असल्याशिवाय शक्यच नाही.
दिल्लीत एका समाजाने दंगल घडवली. हा समाज एकेकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत होता. नंतर आम आदमी पार्टीत सहभागी झाला. त्यानंतर भीम आर्मीवर आरोप झाले. त्यामुळे हे सगळं पूर्वनियोजित होतं, ज्याला ही जबाबदारी दिली होती, त्याला काय करायचं आणि किती करायचं हे व्यवस्थितीत सांगितलेलं होतं', असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.
तसंच, एका रिपोर्टमध्ये सैन्याचे 25 लाख युनिफॉर्म विकले गेल्याची माहिती समोर येत आहे. त्याचा तपास करण्याची मागणी शासनाकडे केली असून हे धोकादायक असून देशासाठी चिंतेचे कारण आहे, असा आरोपही आंबेडकर यांनी केला.
महाविकास आघाडी सरकारच्या बजेट सादर केलं. या बजेटमध्ये केंद्राकडून 8 हजार कोटींचा निधी येणार अशी माहिती देण्यात आली. पण, केंद्राने 8 हजार कोटींचा निधी देण्यास नकार दिला. त्यामुळे या बजेटमध्ये एकूण 16 हजार कोटींची तूट असून मागच्या सरकारने ते लुटले. त्याच्या आधीच्या सरकारनेही लुटले, असा आरोपही आंबेडकर यांनी केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.