हर्षल महाजन, (प्रतिनिधी)
नागपूर, 17 जुलै- न्हाव्याने न विचारता मिशा कापल्याने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना नागपूर जिल्ह्यातील कन्हान येथे समोर आली आहे. कन्हान शहरात या घटनेची खमंग चर्चा सुरू आहे. कन्हान शहर युवा दणका संघटनेचे अध्यक्ष किरण किसन ठाकूर यांनी फ्रेंड्स जेन्टस पार्लरचे सुनील लक्षणे यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे हे प्रकरण?
किरण ठाकूर हे फ्रेंड्स जेन्टस पार्लरमध्ये दाढी करण्यासाठी गेले होते. तिथे सुनील लक्षणे यांनी कोणतीही विचारणा न करता थेट किरण ठाकूर यांच्या मिशीवर वस्तरा फिरविला. यावरून दोघांत वाद झाला. हे प्रकरण थेट कन्हान पोलिसांत पोहचले. मात्र, केवळ वादावरून गुन्हा दाखल करण्यास पोलिसही तयार नव्हते. पोलिसांनी दोघांची समजूत काढली. मिशी कापल्याने आधीच संतापलेल्या किरण ठाकूर यांच्यासाठी इज्जतीचा सवाल झाला होता. यामुळे त्यांनी वकील, पोलिस आणि राजकीय नेते मंडळींशी चर्चा केली. सामाजिक क्षेत्रात काम करणारे सर्वत्र परिचित असल्याने मिशा कापल्यामुळे त्यांना अवघडल्यासारखे वाटत आहे. यामुळे त्यांचा जनसंपर्क कमी झाला आहे. याशिवाय त्यांच्या मुलाच्या शाळेने किरण ठाकूर यांचे ओळखपत्र तयार केले आहे. त्यावर असलेला फोटोमध्ये त्यांच्या मिशा आहेत. आता त्यांना मुलाला भेटायला जायचे असल्यास मिशा नसल्याने प्रवेश दिला जाणार नाही, असाही तर्क दिला. यावर कन्हान पोलिसांनी न्हावी सुनील लक्षणे यांच्यावर भादंवि 1860 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची कन्हान शहरात खमंग चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे मिशीसाठी जिल्ह्यातील मोठ्या नेत्यांकडून राजकीय दबाव आणल्याचीही चर्चा आहे.
VIDEO : आम्हाला हिशेब पाहिजे, उद्धव ठाकरेंचा विमा कंपन्यांना थेट इशारा