पणजी, 6 ऑगस्ट: अरबी समुद्र आणि पश्चिम बंगालचा उपसागरात निर्माण झालेल्या वातावरणीय बदलामुळे मान्सून अधिक सक्रिय झाला आहे. त्यामुळे गोव्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे. पेडणे येथे 251 मिलिमीटर इतका विक्रमी पाऊस झाला आहे. त्यात पेडणे बोगद्यात भिंत कोसळल्याने कोकण रेल्वे ठप्प झाली आहे. रुळावर आलेला मातीचा ढिगारा हटवण्याचं काम सुरू आहे. मात्र, बोगद्यात पडलेली माती ढिगारा मोठा असल्याने तो हटवण्यासाठी पुढचे चार ते पाच दिवस लागू शकतील, असही माहिती मिळाली आहे.
पुढचे चार-पाच दिवस कोकण रेल्वेचा हा मार्ग बंद राहणार असून कोकण रेल्वेच्या अनेक नियमित गाड्या पुणे, मिरजमार्गे वळवण्यात आल्या आहेत, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनानं दिली आहे.
हेही वाचा...महाराष्ट्र लॉकडाऊनमधून कधी मुक्त होणार आधी सांगा? प्रकाश आंबेडकरांचा रोखठोक सवाल
अनेक गाड्यांचे मार्ग वळवले...
02617 एर्नाकुलम-निजामुद्दीन दिल्ली, 06346 त्रिवेंद्रम- लोकमान्य टिळक बांद्रा मुंबई, 02432 न्यू दिल्ली- तिरुअनंतपुरम 02618 निजामुद्दीन दिल्ली एर्नाकुलम, 06345 लोकमान्य टिळक टर्मिनल मुंबई-तिरुअनंतपुरम या सर्व गाड्या पुणे-मिरज- लोंढा-मडगाव- कारवार या मार्गावरून सोडण्यात आल्या आहेत.
गोवा एक्सप्रेस कॅसल रॉक अडकून पडली
मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली असून ठिकाणची वाहतूक ठप्प झाली आहे. गोवा कर्नाटक वाहतुकीसाठी महत्त्वाचा असणाऱ्या चोर्ला घाटात झाडे पडल्याने इथली वाहतूक बंद झाली आहे. तर दुसरीकडं दक्षिण पश्चिम रेल्वेच्या कोळे कॅसल रॉक पुणे रेल्वे मार्ग दरम्यान दरड कोसळल्यानं रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली होती. यामुळे दिल्लीवरून गोव्याला येणारी गोवा एक्सप्रेस कॅसल रॉक अडकून पडली होती. दुसरीकडे, उत्तर गोव्यातली शापुरा नदी दुथडी वाहत असून ठिकठिकाणी पाणी साचल्याने स्थानिक वाहतूकही बंद पडली आहे. हा पाऊस उद्यापर्यंत असाच राहणार असल्याची माहिती गोवा वेधशाळेने दिली आहे.
हेही वाचा...आईच्या निधनानंतर अवघ्या 3 दिवसांत उतरले कोरोना युद्धात
...तरच घराबाहेर पडा
अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका, अशी सूचनाही प्रशासनाच्यावतीने करण्यात आली असून मासेमारीसाठी समुद्रात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर ओल्ड गोवा इथं 120, वाळपई इथं 90, केपे इथं 121 ,सांगे इथं 131 मिलिमीटर पाऊस पडला आहे. या पावसाचा जनजीवन आणि वाहतुकीवर काहीसा परिणाम झाला आहे. समुद्रामध्ये आणि भूभागावर ताशी 40 ते 45 किलोमीटर वेगाने वारे वाहत असल्याने लाटांची उंची वाढली आहे . त्यामुळे मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात उतरू नये, असं कॅप्टन पोर्ट सुचवलं आहे.