कोरोना उपचाराबाबत कोल्हापूरकरांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली GOOD NEWS

कोरोना उपचाराबाबत कोल्हापूरकरांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली GOOD NEWS

हा प्रयोग कोल्हापूर जिल्ह्याच्या दृष्टीने दिलासादायक असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

  • Share this:

कोल्हापूर, 5 जून : सीपीआर हॉस्पिटलमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपी यशस्वी झाली असून हा प्रयोग कोल्हापूर जिल्ह्याच्या दृष्टीने दिलासादायक असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी कोल्हापुरात यशस्वी झालेली प्लाझ्मा थेरेपी ही सर्वार्थाने महत्वाची बाब असल्याचे सांगून जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले की, कोरोनामुक्त झालेल्या रूग्णाच्या रक्तामधून प्लाझ्मा घेण्यासाठी सीपीआर रुग्णालयास राज्यातील सर्वात अत्याधुनिक असलेलं प्लाझ्मा अफरेशिस मशिन प्राधान्याने उपलब्ध करुन देण्यात आले होते. त्यामुळे कोरोनामुक्त रूग्णाच्या रक्तामधून प्लाझ्मा घेणे शक्य झाले असून गंभीर,अत्यवस्थ कोरोना रूग्णांवर या प्लाझ्मा थेरेपीच्या माध्यमातून उपचार करण्याची सोय कोल्हापुरात उपलब्ध झाली आहे.

कोरोनामुक्त झालेल्या जिल्ह्यातील पहिल्या रूग्णाच्या रक्तामधून प्लाझ्मा घेण्यात आला होता. हा प्लाझ्‌मा सीपीआरमधील एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णास देण्यात आला. प्लाझ्मा दिल्यानंतर तिसऱ्या दिवशी संबंधित कोरोना रुग्णांचा स्वॅब घेण्यात आला तो निगेटिव्ह आला आहे. तसेच तो रुग्ण आरोग्याच्यादृष्टीने अतिशय चांगला असल्याचे सीपीआरचे हिमॅटोलॉजिस्ट डॉ. वरूण बाफना यांनी सांगितले. जिल्हयातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी ही अत्यंत दिलासादायक बाब असल्याचेही ते म्हणाले. यापुढेही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना प्लाझ्मा दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात पहिली प्लाझ्मा थेरेपी यशस्वी करण्याकामी सीपीआरमधील हिमॅटोलॉजिस्ट डॉ. वरूण बाफना यांच्यासह डॉ. विजय बर्गे, डॉ. शीतल यादव आणि डॉ. राजेंद्र मदने यांचे सक्रीय योगदान असून या डॉक्टरांच्या कार्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कौतुक केले असून सीपीआरमध्ये काम करणाऱ्या सर्वच वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांनी धन्यवाद दिले आहेत.

पुण्याहून आलेला आणि जिल्ह्यात सापडलेला पहिला कोरोना रूग्ण 18 एप्रिल रोजी कोरोनामुक्त झाला. या कोरोनामुक्त झालेल्या युवकाच्या मान्यतेने त्याच्या रक्तातील 550 मिली प्लाझ्मा घेण्यात आला होता. कोरोना बाधित गंभीर, अत्यवस्थ रूग्णावर प्लाझ्मा थेरेपीच्या माध्यमातून उपचार करण्यासाठी उपयोगी ठरला आहे.

प्लाझ्मा थेरेपीच्या माध्यमातून कोरोना बाधितांवर उपचार करण्याचा हा  कोल्हापूरमधील पहिलाच प्रयोग असून तांबड्या-पांढऱ्यासाठी, गुळासाठी  वा चप्पलेसाठी प्रसिध्द असणाऱ्या कोल्हापुरात हा प्लाझ्मा थेरेपीचा प्रयोग यशस्वी ठरल्याने रांगड्या कोल्हापूरने वैद्यकीय क्षेत्रातही आपली देशाला वेगळी ओळख करुन दिली आहे. याचा सार्थ अभिमान कोल्हापूरकरांना निश्चितच आहे. 

First published: June 5, 2020, 11:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading