राहुल खंदारे, प्रतिनिधी
बुलडाणा, 21 डिसेंबर : मतदान म्हणजे लोकशाहीचा उत्सव...पण या उत्सवाला मतदाराराजा नको त्या आमिषाला बळी पडत असल्याचे विदारक चित्र आज बुलडाण्यात (buldhana) पाहण्यास मिळालं. नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी (Nagar Panchayat elections) मतदान पार पडलं पण काही ठिकाणी मतदारांना चक्क दारूचे आमिष दिलं गेलं अन् मतदारराजानेही बाटलीसाठी हात पुढे केला. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
मतदान म्हटलं की मतदारांना वेगवेगळी आमिषं, आवाहनं तसंच भूलथापांना बळी पाडून आपल्या पदरात अनेकदा मते पाडून घेताना उमेदवारांना पाहिले आहे. अनेक ठिकाणी दारूचा पूरही वाहत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. बुलढाणा जिल्ह्यातही आज मोताळा आणि संग्रामपूर या दोन ठिकाणी नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. या मतदानाच्या प्रक्रियेदरम्यान मोताळा येथील काही मतदारांना दारूचे आमिष देऊन मतदान करायला भाग पाडत असल्याचा एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे.
#बुलडाणा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदानादरम्यान मतदारांना दारूची ऑफर, व्हिडीओ आला समोर... pic.twitter.com/Rlk7vled4r
— News18Lokmat (@News18lokmat) December 21, 2021
त्यामुळे, निवडणूक आयोगाचे कर्मचारी नेमके करताय तरी काय? आचारसंहिता केवळ नावालाच उरली काय ? असे अनेक प्रश्न या व्हिडीओला पाहिल्यानंतर उपस्थित होत आहेत. या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे एक इसम एका मतदाराला दारूची बॉटल दाखवत आमिष देत असल्याचं पाहायला मिळत आहे.
त्यामुळे ग्रामीण भागातील निवडणुकांमध्ये ग्रामीण आणि गरीब मतदारांना अशाच पद्धतीने शे-पाचशे किंवा दारू पाजून मतदारांकडून मतं मिळवली जातात आणि अशा पद्धतीने निवडणूक निवडून आल्यानंतर तो उमेदवार कसं काम करेल याबाबत काही वेगळे सांगायला नको. हा संपूर्ण धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद्ध झाल्यानंतरही अद्याप कुठल्याच प्रकारची कारवाई झालेली नाही. निवडणूक आयोगाकडूनही कोणतेही पाऊल उचलले नाही. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.