Home /News /maharashtra /

ठाकरे सरकारमध्ये अस्थितरता? शरद पवार-अमित शहा भेटीनंतर चर्चेनं पकडला वेग

ठाकरे सरकारमध्ये अस्थितरता? शरद पवार-अमित शहा भेटीनंतर चर्चेनं पकडला वेग

ही बैठक झाल्याची माहिती पुढे आल्यानंतर महाविकास आघाडीवर संभ्रमाचे काळे ढग जमायला सुरुवात झाली आहे.

नवी दिल्ली, 28 मार्च : राज्यात महाविकास आघाडीचं (MVA) सरकार आल्यापासून हे सरकार किती काळ टिकेल, याबाबत भाजपकडून (BJP) वारंवार प्रश्नचिन्ह लावण्यात येतं. मात्र गेल्या दोन दिवसापासून भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) व ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांच्या दरम्यान एक बैठक झाल्याची माहिती पुढे आल्यानंतर महाविकास आघाडीवर संभ्रमाचे काळे ढग जमायला सुरुवात झाली आहे. अमित शहा यांनी प्रत्येक गोष्ट सार्वजनिक करण्याची आवश्यकता नाही असं सांगत याबाबतच्या चर्चांना आणखीनच तीव्र केलं आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या भेटीला अफवा संबोधून नवा ट्विस्ट निर्माण करण्यात आला आहे. अमित शहा आणि शरद पवार यांची शुक्रवारी अहमदाबादमध्ये भेट झाल्याची माहिती पुढे आली आहे. 25 मार्च रोजी संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपले होते. त्यानंतर शरद पवार हे जयपूरला राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांची भेट घेणार असल्याचे माहिती पुढे आली होती. यानुसार पवार यांनी आपला दौरा देखील पूर्ण केला. मात्र या दौऱ्याच्या दरम्यान अहमदाबादमध्ये जाऊन एका कार्यक्रमात अमित शहा आणि पवार यांची भेट झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. हेही वाचा- शरद पवारांसोबत झालेल्या बैठकीबाबत अमित शहांची सूचक प्रतिक्रिया परमवीर सिंह यांच्या लेटर बॉम्बनंतर राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघालेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि कॉंग्रेस यांच्यातील राजकीय संबंध शाब्दिक वादातून ताणले जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. दरम्यान पवार आणि अमित शहा यांच्या भेटीनंतर काँग्रेस सध्या कुठलेही उत्तर देण्यास तयार नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या संपूर्ण भेटीचे वृत्त फेटाळण्यात आलं आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि ज्येष्ठ नेते नवाब मलिक म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांची अहमदाबाद येथे अमित शहा यांच्यासोबत कोणतीही भेट झाली नाही. केवळ अफवा पसरवून संभ्रम निर्माण करण्यात आला आहे. गेले दोन दिवस बातम्या पसरवण्यात आल्या आणि एका वृत्त पत्रामध्ये लहान बातमी करुन चॅनेलवर बातम्या दाखवायला सुरुवात करण्यात आल्या. एका पत्रकाराकडून प्रश्न विचारुन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न स्वतः अमित शहा यांनी केला आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. ज्या बातम्या पसरवण्यात आल्या त्या खोट्या आहेत. कोणतीही भेट झालेली नाही आणि भेटण्याचा उद्देश किंवा कारण असू शकत नाही, असंही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. राजधानी दिल्लीमध्ये आज अमित शहा यांच्या पत्रकार परिषदेमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तर देताना शहा यांनी भेटीला होकार देखील दिला नाही आणि नकार देखील दिला नाही. त्यामुळे अधिक संभ्रम निर्माण झाला आहे. प्रत्येक गोष्ट ही सार्वजनिक करण्याची गरज नाही असे सांगून महाविकास आघाडीच्या भवितव्याविषयी अमित शहा यांनीही अप्रत्यक्षपणे शंका निर्माण केल्याचं दिसत आहे. त्यामुळे आगामी काळात राज्याच्या राजकारणात नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहावं लागेल.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Amit Shah, Sharad pawar, Uddhav Thackeray (Politician)

पुढील बातम्या