सिंधुदुर्ग, 30 डिसेंबर : शिवसेना (Shiv Sena) आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा टोकाला गेला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे (Sindhudurg district bank) विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत (Satish Sawant) यांचे निकटवर्तीय आणि शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर 18 डिसेंबरला हल्ला झाला होता. या हल्ल्याचे धागेदोरे भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यापर्यंत असल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे नितेश राणे हे सध्या अज्ञातवासात गेले आहेत. त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी कोर्टात धाव घेतली आहे. तर दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेसाठी आज मतदान पार पडलं. या दरम्यान कणकवली येथील मतदारकेंद्राबाहरे शिवसेना आणि राणे समर्थक आमनेसामेन आले. पोलिसांनी यावेळी मध्यस्ती करत प्रकरण निवळलं. पण परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या तणावावरुन दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून परस्परांवर सडकून टीका करण्यात आलीय.
नेमकं काय घडलं?
काही शिवसैनिकांनी मतदान केंद्राबाहेर फटाके फोडले. त्यानंतर राणे समर्थक आक्रमक झाले. यावेळी शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले. पण पोलिसांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखत मध्यस्ती केली. त्यांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची समजूत घातली. त्यानंतर परिसरातील तणावाचं वातावरण बघता दंगल नियंत्रक पथकाला घटनास्थळी पाचरण करण्यात आलं. यावेळी प्रचंड हायव्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला. दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांकडून प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.
हेही वाचा : Sindhudurg District Bank Election: भाजपला मोठा झटका
राणे समर्थकांची भूमिका
"शिवसैनिक जर फटाके लावत असतील तर उद्या आम्ही बॉम्ब फोडू", असं राणे समर्थक प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणाले आहेत. यावेळी राणे समर्थकांनी प्रचंड घोषणाबाजी केली. "तणावाचे वातावरण ते निर्माण करत आहेत. त्यांच्याकडे विकासाचा मुद्दा नाही. कळीच्या मुद्द्यावरुन रडत बसायचं. चिवसैनिक. खोट्या तक्रारी करुन असे भिकारडे हे शिवसैनिक आहेत का? आमचे नितेश साहेब विकासाचं व्हिजन घेऊन जिल्ह्यात फिरतात. आज त्यांनी फटाके लावले आहेत. कारण उद्या त्यांना फटाके लावायला मिळणार नाहीत", असा घणाघात एका महिला कार्यकर्ताने शिवसेनेवर केला.
महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश सावंत यांची प्रतिक्रिया
दरम्यान, महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश सावंत यांनी मतदानानंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. "महाविकास आघाडी राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस एकत्र निवडणूक लढवत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना निकालाची खात्री आहे. उद्याचा गुलाल हा महाविकास आघाडीच्या माध्यमातून शेतकरी उधळतील. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत 19 पैकी 19 जागा महाविकास आघाडीच्या येतील. जे थकीत आहेत त्यांना बँकेचं संचालकपद कशाला द्यावे?", असा सवाल सतीश सावंत यांनी उपस्थित केला.
हेही वाचा : दिवसभरात भाजपला दुसरा मोठा झटका
महाविकास आघाडीचा शंभर टक्के विजयी होणार, आमदार वैभव नाईकांना दावा
दरम्यान, मतदान संपल्यानंतर शिवसेनेककडून जल्लोष करण्यात येतोय. आमदार वैभव नाईक हे देखील मतदार केंद्राबाहेर दाखल झाले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. "अटकपूर्व जामीनाचा बहुतेक निकाल लागला असेल म्हणून शिवसैनिकांनी फटाके फोडले असतील. त्या अटकपूर्व जामिनाच्या निकालाची माहिती घेऊयात. महाविकास आघाडीचा शंभर टक्के विजय होईल. शिवसेनेचे दोन निकाल आहेत. अटकपूर्व जामीन आणि बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेचा विजय होईल. आम्ही शांततेतच ही निवडणूक करत होतो. पण काही लोक अस्वस्थ झाले आहेत. संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबरला हल्ला झाला होता. या हल्ल्याचे धागेदोरे आमदार नितेश राणेंपर्यंत गेले आहेत. पोलिसांनी योग्य दिशेने तपास केला. त्यामुळे मनिष दळवींचा जामीन अर्ज फेटाळला. ते जिल्हा बँकेचे उमेदवार आहेत", अशी प्रतिक्रिया वैभव नाईक यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.