• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • साईबाबांच्या शिर्डीत वादाची ठिणगी, ग्रामस्थ आणि साई संस्थानमध्ये तणाव

साईबाबांच्या शिर्डीत वादाची ठिणगी, ग्रामस्थ आणि साई संस्थानमध्ये तणाव

गावकऱ्यांना मुख्य अधिकाऱ्याने बाहेर काढल्याने शिर्डी ग्रामस्थ आणि साई संस्थानमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

  • Share this:
शिर्डी, 3 जानेवारी : शिर्डीमध्ये ग्रामस्थ आणि साईबाबा संस्थानमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. एका अधिकाऱ्याच्या आडमुठे धोरणामुळे हा वाद सुरू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. नवीन वर्षाची सुरुवात साईदर्शनाने करण्यासाठी गेलेल्या शिर्डीच्या नगराध्यक्षांसह गावकऱ्यांना मुख्य अधिकाऱ्याने बाहेर काढल्याने शिर्डी ग्रामस्थ आणि साई संस्थानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. याप्रकरणी साई संस्थानने पोलिसात तक्रार केल्याने हा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत. कोरोनाच्या संकटामुळे साई मंदिर मार्च महिन्यापासून नोव्हेंबरपर्यंत बंद होते. मात्र 16 नोव्हेंबर रोजी मंदिर उघडल्यानंतर भक्तांची संख्या आता वाढायला लागली आहे. त्यातच मंदिर बंद असताना मुख्य कार्यकारी अधिकारीपदी आएस ऑफिसर के एच बगाटे यांची नियुक्ती झाली. आजवर गेल्या शंभर वर्षापासून साईमंदिरात गावातील अनेक जणांना सण उत्सव आणि दररोज मानाचं स्थान आहे. साईबांबांच्या समकालीन असणाऱ्या कुटुंबीयांना मानाने सर्व गोष्टीत सहभागी करून घेतले जाते. वर्षभर दररोज साईदर्शन घेणाऱ्या गावकऱ्यांनी कोरोनाचे नियम पाळत मंदिर उघडल्यानंतरही साई दर्शनाला कधी गर्दी केली नाही. मात्र नवीन वर्षाची सुरुवात साईदर्शन घेऊन करावी यासाठी अनेक गावकरी 31 डिसेंबरच्या रात्री साईमंदिर परिसरात गेले. यात शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांच्यासह शिर्डीतील प्रतिष्ठीत नागरीकही होते. माजी विश्वस्त तथा शिवसेनेच्या नगरसेविका अनिता जगताप, माजी विश्वस्त सचिन तांबे,नगरसेवक सुजीत गोंदकर, माजी उपनगराध्यक्ष विजय जगताप यांच्यासह अनेक शिर्डीकरांना मुख्यकार्यकारी आधिकारी कान्हूराज बगाटे यांनी साईमंदिरात जाताना रोखले. तुम्हाला सर्वात प्रथम सोडतो, असं म्हणत हुल देवून कार्यकारी आधिकाऱ्यांनी नगराध्यक्षांसह सर्वांना मंदिर परिसराच्या बाहेर काढले. यावेळी शिर्डी ग्रामस्थ आणि बगाटे यांच्यात बराच वेळ तू तू मै मै देखील झाली. बराच वेळ गोंधळ झाल्यानंतर ग्रामस्थांचा रोष पाहता मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी दिलगिरी व्यक्त केली. मात्र ग्रामस्थांना अपमानास्पद वागणूक मिळाल्याने अनेक ग्रामस्थांनी मंदिरात न जाता बाहेरूनच साईंचं दर्शन घेत बगाटे यांच्यावर आगपाखड केली.
Published by:Akshay Shitole
First published: