राष्ट्रवादीकडून आमदारकीच्या चर्चेनंतर राजू शेट्टींच्या स्वाभिमानीतच भूकंप, 2 मोठे नेते नाराज

राष्ट्रवादीकडून आमदारकीच्या चर्चेनंतर राजू शेट्टींच्या स्वाभिमानीतच भूकंप, 2 मोठे नेते नाराज

आमदाराकीची चर्चा राजू शेट्टी यांच्यासाठी नवी डोकेदुखी ठरणार की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

  • Share this:

कोल्हापूर, 18 जून : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी हे राष्ट्रवादीकडून विधानपरिषद आमदार होण्याची शक्यता आहे. राजू शेट्टी यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बारामतीत जाऊन भेट घेतल्यानंतर तर या चर्चेनं अधिकच वेग पकडला आहे. मात्र अशातच आता ही आमदाराकीची चर्चा राजू शेट्टी यांच्यासाठी नवी डोकेदुखी ठरणार की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण स्वाभिमानीचे दोन मोठे नेते या मुद्द्यावरून नाराज झाले आहेत.

'विधान परिषदेची आमदारकी कार्यकर्त्याला द्यायला हवी होती. शरद पवारांना भेटायला जाताना आम्हाला विश्वासात घेतलं नाही,' अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील कार्यकर्त्यांनी न्यूज18 लोकमतसोबत बोलताना दिली आहे. हे नेते राजू शेट्टी यांच्यावर नाराज झाले असून स्वाभिमानी शेतकरी संघटना फुटीच्या उंबरठ्यावर आहे का, अशी चर्चाही त्यामुळे सुरू झाली आहे.

जयंत पाटलांनी घेतली होती भेट

राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी हे विधान परिषदेत निवडून जाण्याची शक्यता आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजू शेट्टी यांच्याशी झालेल्या चर्चेवेळी तसा प्रस्ताव काही दिवसांपूर्वी दिला आहे. राजू शेट्टी यांनी विधानपरिषदेवर जावं, अशी खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भूमिका असल्याची माहिती आहे.

राजू शेट्टी पवारांच्या बारामतीत

शरद पवार यांच्या विरोधात एकेकाळी शेट्टी यांची शेतकरी संघटना बारामतीत आणि पुणे पश्चिम महाराष्ट्रात संघर्ष करत होती. एवढंच नाहीतर राजू शेट्टी यांनी बारामतीत ही पवारांचा विरोधात आंदोलनं केली होती. पण त्याच राजू शेट्टी यांनी बुधवारी शरद पवार यांची बारामतीत जाऊन भेट घेतली.

2014 ची लोकसभा निवडणुकीवेळी राजू शेट्टी यांनी भाजपा व मित्र पक्षांच्या सहकार्याने निवडणूक लढवली होती. पण तीन वर्षानंतर त्यांचे भाजपाशी संबंध बिघडले. त्यांनी मोदी-भाजपावर टीकेचा प्रहार सुरू केला. तेव्हापासून ते काहीसे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे झुकले होते. लोकसभा निवडणूक त्यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांना अपयश आले.

लोकसभा – विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाची चर्चा होत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विधान परिषदेतील एखादी जागा मिळावी, असा आग्रह महाविकास आघाडीकडे धरला होता. त्यामुळे आता खुद्द शरद पवारांनीच राजू शेट्टींना विधान परिषदेची ऑफर दिली आहे.

संपादन - अक्षय शितोळे

First published: June 18, 2020, 9:56 AM IST

ताज्या बातम्या