Home /News /maharashtra /

फडणवीसांची 'ऑफ द रेकॉर्ड' चर्चा फेसबुकवर लाइव्ह गेल्यानं खळबळ

फडणवीसांची 'ऑफ द रेकॉर्ड' चर्चा फेसबुकवर लाइव्ह गेल्यानं खळबळ

'त्यावेळी सरकार स्थापन करण्यासाठी वाद निर्माण झाला होता. शिवसेनेनं सोबत येण्यास नकार दिला होता. शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाणार असल्याचे कळले होते.

    मुंबई, 19 जानेवारी : 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला होता. तेव्हा राष्ट्रवादीने आपल्याकडे सत्ता स्थापनेसाठी प्रस्ताव पाठवला होता. त्यावेळी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाली होती, असा दावा भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. दैनिक महाराष्ट्र टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, नागपूरमध्ये तरुण उद्योजक आणि व्यावसायिकांच्या जनरेशन नेक्स्ट 'एन्टरप्रेनर फोरम' यांच्याकडून भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत आयोजित करण्यात आली होती. ही मुलाखत ऑफ लाईन घेण्याचे ठरले होते. याचे कुठेही प्रसारण होणार नव्हते. या कार्यक्रमाला सुद्धा निवडक लोकांना बोलावण्यात आले होते. मुलाखतीला सुरुवात झाल्यानंतर फडणवीस यांना दीड वर्षांपूर्वी शपथविधी सोहळ्याबद्दल विचारण्यात आले होते. त्यावेळी फडणवीस यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला, नेमके याच मुलाखताची फेसबुक लाईव्ह हे सुरूच होते. 'त्यावेळी सरकार स्थापन करण्यासाठी वाद निर्माण झाला होता. शिवसेनेनं सोबत येण्यास नकार दिला होता. शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाणार असल्याचे कळले होते. त्यामुळे वेगवेगळ्या पर्यायावर चर्चा सुरू झाली होती. 10 ते 12 दिवसांनी आमची बोलणी राष्ट्रवादीशी झाली होती. राष्ट्रावादीकडून सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव आला होता, असा दावा फडणवीस यांनी केला होता. तसंच, 'आमची बोलण सुद्धा अंतिम टप्प्यात पोहोचली होती. एवढंच नाहीतर खातेवाटप,     जिल्ह्याचे पालकमंत्री कोण असणार याची सुद्धा चर्चा झाली होती. ही चर्चा शरद पवार यांच्याशीच झाली होती, असा दावाच फडणवीस यांनी केला होता.  एवढंच नाहीतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू व्हावी यासाठी पत्र सुद्धा मी तयार केले होते, असंही फडणवीस यात म्हणाले होते. ही संपूर्ण चर्चा सुरू असताना नंतर लक्षात आले की फेसबुकवर ही संपूर्ण मुलाखत प्रसारित झालेली आहे. त्यामुळे लगेच ही मुलाखत फेसबुकवरून डिलीट करण्यात आली. तोपर्यंत फडणवीस यांना जो काही संदेश द्यायचा होता तो व्हायरल झाला होता. पण, मुलाखत रद्द का करण्यात आली होती, या प्रश्नाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाला आलेल्या सर्व उपस्थितीतांना मोबाईल बंद करण्यास सांगितले होते. फडणवीस यांच्या टीमकडून फेसबुक चुकून लाईव्ह सुरू होते हे कसे लक्षात आले नाही? फेसबुक माध्यमातून मुद्दाम सूचक संदेश द्यायचा होता की, नवीन समीकरणाचे संकेत द्यायचे होते, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

    तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या