गोविंद वाकड (प्रतिनिधी)
पिंपरी चिंचवड, 8 जून- पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे चालविल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील शवविच्छेदन केंद्रातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. त्यामुळे शवविच्छेदन केंद्रातील कोल्डस्टोरेजमधील मृतदेह कुजण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
शुक्रवारी रात्री पिंपरी शहरात अचानक जोरदार वादळ आले होते. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय परिसतील एक झाड कोसळले. त्यामुळे शवविच्छेदन केंद्राचा विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. या घटनेला आता तब्बल 12 तासांहून जास्त वेळ झाला आहे. मात्र अजूनही विद्युत पुरवठा जोडला न गेल्याने कोल्ड स्टोरेजमधील मृतदेह कुजण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दुसरीकडे, नवे मृतदेह घेणं बंद करण्यात आलं असून कोल्डस्टोरेजमधील मृतदेह नातेवाईकांना घेऊन जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, या बाबत चे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता वाबळे यांना विचारणा केली असता लवकरच विद्युत पुरवठा पूर्ववत केला जाईल, हे स्पष्टीकरण त्यांनी दिले. मात्र, कोल्ड स्टोरेज सुरू राहावा यासाठी पर्यायी व्यवस्था का केली नाही, या प्रश्नाला उत्तर देणे त्यांनी टाळले. या सगळ्या प्रकारामुळे शहरातील संघटनांकडून महापालिका प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
दौंडमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी..
दौंड तालुक्यातही विविध ठिकाणी शुक्रवारी वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. उष्णतेमुळे हैराण झालेल्या दौंडकरांना सायंकाळी आलेल्या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला. पाऊस येण्याअगोदर मोठ्या प्रमाणावर सोसाट्याचा वारा सुटला होता. यानंतर विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडागडासह पावसाच्या जोरदार सरी बरसू लागल्या. पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या आशा या आलेल्या पहिल्या पावसामुळे पल्लवित झाल्या आहेत.
बाळासाहेब ठाकरेंकडे दैवी शक्ती: चंद्रकांत खैरेंचा पुन्हा अजब दावा