सरपंच थेट जनतेतून नाहीच! सदस्य ठरवणार गावचा कारभारी, ठाकरे सरकारचा निर्णय

सरपंच थेट जनतेतून नाहीच! सदस्य ठरवणार गावचा कारभारी, ठाकरे सरकारचा निर्णय

राज्यात सत्तांतर होताच महाविकास आघाडी सरकारनं फडणवीसांचा निर्णय रद्द करण्याची घोषणा केली आहे.

  • Share this:

मुंबई, 29 जानेवारी:  सरपंचांची थेट जनतेतून केली जाणारी निवड राज्य सरकारनं रद्द केलीय. मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत यासंदर्भातल्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे यापुढे होणाऱ्या सरपंचांची निवड ही जनतेतून न होता सदस्यांमधून होणार आहे. ठाकरे सरकारनं घेतलेल्या या निर्णयाला भाजपसह राज्यातील अनेक ग्रामपंचायतींनी ठराव करून विरोध केला होता. तरीही सरकार आपल्या भूमिकेवर ठाम राहीलं असून ठाकरे सरकारनं भाजपला दणका दिल्याचं मानलं जातंय.

फडणवीस सरकारचा निर्णय बदलला

फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर थेट जनतेतून सरपंच निवडण्याचा निर्णय घेतला. त्याचा भाजपला राज्यात मोठा फायदाही झाला. पण राज्यात सत्तांतर होताच महाविकास आघाडी सरकारनं फडणवीसांचा निर्णय रद्द करण्याची घोषणा केली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सगळ्यात पहिल्यांदा याचं सुतोवाच केलं होतं. एकाच विचारधारेचा सरपंच निवडून येतो. पण सदस्यांची विचारधारा वेगळी असते. त्याचा परिणाम थेट विकास कामांवर होतो असं कारण देत ठाकरे सरकारनं फडणवीसांचा निर्णय रद्द केला आहे.

ग्रामपंचायतींनी केला होता विरोध

सरपंचांची निवड थेट जनतेतून करायची की नाही या मुद्दयाावरून सत्ताधारी आणि विरोधकांबरोबच राज्यातल्या ग्रामपंचायती आणि राज्य सरकारही आमने सामने आले होते. राज्यात सत्तेवर आलेल्या ठाकरे सरकारनं सरपंचांची निवड थेट जनतेतून न करता सदस्यांमधून करण्याचा निर्णय घेतल्यानं चिडलेल्या हजारो अनेक ग्रामपंचायतींनी ठाकरे सरकारच्या या निर्णयाला तीव्र विरोध करायला सुरुवात केली होती. सरपंचाची निवड ही जनतेतूनच व्हावी अशा प्रकारचा ठराव घेत राज्यातील ९ हजार ग्रामपंचायतींनी थेट ठाकरे सरकारलाच आव्हान दिलं होतं.

‘लोकशाही पद्धती आहे, अध्यक्षीय नाही’

राज्यातल्या ग्रामपंचायतीनी सरकारच्या निर्णयाविरोधात ठराव केले असले तरी राज्य सरकार निर्णयावरून मागे हटलं नाही. देशात लोकशाही पद्धती असून अध्यक्षीय पद्धत मान्य नाही अशी स्पष्ट भूमिका सरकारच्या वतीनं मांडण्यात आली होती. दरम्यान राज्यातील ग्रामपंचायतींनी घेतलेल्या ठरावांमागे काही राजकीय हेतू आहे असा सवाल करत ग्रामविकास मंत्र्यांनी भाजपकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न केला होता.

First published: January 29, 2020, 5:41 PM IST

ताज्या बातम्या