भयंकर अपघात: बस आणि गॅस टँकरची जोरदार धडक, 3 जणांचा होरपळून मृत्यू

भयंकर अपघात: बस आणि गॅस टँकरची जोरदार धडक, 3 जणांचा होरपळून मृत्यू

या अपघातानंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतला तर गॅस टँकरमधून महाकाय आगीचे तब्बल 50 फुटापर्यंत लोळ उसळत होते.

  • Share this:

धुळे, 18 मे : काळजाचा ठोकाच चुकवेल असा भीषण अपघात नागपूर - सुरत महामार्गावरील मुकटी शिवारातील भिरडाने फाट्याजवळ  झाला आहे. ट्रॅव्हल्स आणि गॅस टँकरच्या समोरासमोर झालेल्या धडकेमुळे हा भीषण अपघात झाला असून यात तीन जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

खासगी ट्रॅव्हल्स बस ही जलगावहून धुळ्याकडे येत होती तर टँकर हा जळगावच्या दिशेने जात होता. त्याचवेळी भरधाव ट्रॅव्हल्स बसने समोरून येणाऱ्या टँकरला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की काही क्षणात दोन्ही वाहनांनी पेट घेतला. यात दोन्ही वाहन जळून खाक झाली असून वाहनांची आणि मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.

दरम्यान, ट्रॅव्हल्स बस मध्ये नेमके प्रवासी किती होते हे ही अजून स्पष्ट झालेले नाही. या अपघातानंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतला तर गॅस टँकरमधून महाकाय आगीचे तब्बल 50 फुटापर्यंत लोळ उसळत होते.

अपघातानंतर होणाऱ्या स्फोटांचा आवाज व आगीचे लोळ एक ते दोन किलोमीटर पर्यंत पाहता येत होते. आगीच्या लोळात दोन्ही वाहने असल्याने जवळपास कुणीही जाऊ शकणार नाही, अशी स्थिती होती. 

संपादन - अक्षय शितोळे

First published: May 18, 2020, 11:01 PM IST

ताज्या बातम्या