15 मे : बीड जिल्ह्यातल्या मुंडे विरुद्ध मुंडे या पारंपरिक लढाईत पुन्हा एकदा धनंजय मुंडेंनी बाजी मारलीय. परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत धनंजय मुंडेंच्या पॅनलने दणदणीत विजय मिळवलाय. समितीच्या 18 जागांपैकी 14 जागा धनंजय मुंडे गटाने जिंकल्यात.
तर पंकजा मुंडे गटाला अवघ्या 4 जागांवर समाधान मानावं लागलंय. यापूर्वीच्या नगरपालिका आणि झेडपी इलेक्शनमध्येही धनंजय मुंडे गटाने बाजी मारलीय.
झेडपीत राष्ट्रवादीने सर्वाधिक जागा जिंकूनही सत्ता स्थापनेत मात्र भाजपच्या पंकजा मुंडेंनीच बाजी मारलीय. राष्ट्रवादीचे आमदार सुरेश धस यांनी बंडखोरी केल्याने झेडपी अध्यक्ष भाजपचा बनलाय. बाजार समितीत मात्र, 18 पैकी 14 जागा जिंकत धनंजय मुंडे गटाने स्पष्ट बहुमत मिळवलंय.
गेल्या तीस वर्षांपासून परळी बाजार समिती स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्याच ताब्यात होती. गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे मोठे बंधू पंडितअण्णा मुंडे हेच या बाजार समितीचा कारभार बघायचे. पंडित अण्णांनी बंडखोरी केल्यानंतर या बाजार समितीवर धनंजय मुंडेंनी एक हाती अंमल ठेवला होता. आता तीच परळी बाजार समिती पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्या हातात आली आहे.