मुंबई, 13 एप्रिल : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांना उपचारासाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Dycm Ajit Pawar) यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यानंतर अजित पवारांनी धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीबाबतची माहिती माध्यमांना दिली आहे.
हृदयविकाराचा धक्का हे वृत्त चुकीचं...
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची प्रकृती चांगली असून तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ते उपचार घेत आहेत. सतत प्रवास, दगदग यातून त्यांना भोवळ येऊन शुद्ध हरपली आणि त्यानंतर तातडीने त्यांना ब्रीच कँडी मध्ये दाखल करण्यात आले. त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला, हे वृत्त चुकीचे आहे; डॉक्टरांनी आणखी काही चाचण्या सांगितल्या असून सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला
आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन धनंजय मुंडे यांची भेट घेतली, यावेळी त्यांनी मुंडे यांची विचारपूस करत डॉक्टरांकडून माहिती घेतली. डॉक्टरांनी त्यांना सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला असून, येत्या तीन - चार दिवसात त्यांना आराम मिळेल, असेही अजित पवार म्हणाले. रुग्णालयाच्या वतीने डॉ. प्रतीत समदानी यांनी अधिक माहिती दिली. अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत विश्रांतीचा सल्ला दिला.
भोवळ आल्याने शुद्ध हरपली
काल धनंजय मुंडे जनता दरबारास उपस्थित होते, त्यानंतर शरद पवार यांना भेटले, या दरम्यान प्रकृती अस्थिर होऊन त्यांना भोवळ आल्याने शुद्ध हरपली होती, अशी माहिती अजित पवार यांनी माध्यमांना दिली.
दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीही धनंजय मुंडे यांना दूरध्वनीवरून संपर्क करत विचारपूस करून काळजी घेण्याचा सल्ला दिला असून लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर खासदार सुप्रियाताई सुळे, युवक नेते पार्थ पवार, राज्यमंत्री दत्ता मामा भरणे यांनी रुग्णालयात जाऊन धनंजय मुंडे यांची भेट घेऊन चौकशी केली तसेच बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
वाचा : राज ठाकरेंना जयंत पाटलांचं प्रत्युत्तर,"वारसा प्रबोधनकार ठाकरेंचा मात्र विचार.."
धनंजय तू आराम कर - अजित पवार
रुग्णालयातील चर्चे दरम्यान उद्या 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असून, राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागामार्फत जयंतीनिमित्त शासकीय कार्यक्रमाचे आयोजन मुंबई येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली विभागाने केली आहे. याबद्दल चर्चा करताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'धनंजय तू आधी बरा हो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम आम्ही सगळे मिळून यशस्वी करू;' असा स्नेहाचा सल्लाही धनंजय मुंडे यांना दिला.
काल सायंकाळी धनंजय मुंडे यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही विचारपूस करत माध्यमांना मुंडेंच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली होती. काळजी करण्यासारखे काही नाही, असे राजेश टोपे म्हणाले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajit pawar, Dhananjay munde