धनंजय मुंडे प्रकरणी नवा ट्विस्ट: 'ती मलाही ब्लॅकमेल करत होती', भाजप नेत्याच्या पत्रामुळे कलाटणी

धनंजय मुंडे प्रकरणी नवा ट्विस्ट:  'ती मलाही ब्लॅकमेल करत होती', भाजप नेत्याच्या पत्रामुळे कलाटणी

विवाहबाह्य संबंधांची जाहीर कबुली दिल्यानंतर धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत आणि त्यांनी राजीनामा द्यावा यासाठी दबाव वाढत आहे. एकीकडे यासंदर्भात राष्ट्रवादीची पक्षांतर्गत बैठक सुरू असली, तरी दुसरीकडे भाजपच्या एका नेत्याचं एक पत्र मुंडेंच्या मदतीला धावून आलं आहे.

  • Share this:

मुंबई, 14 जानेवारी : राष्ट्रवादी काँग्रेसचा कट्टर प्रतिस्पर्धी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्याच एका नेत्यामुळे धनंजय मुंडे प्रकरणी नवा ट्विस्ट मिळण्याची शक्यता आहे. विवाहबाह्य संबंधांची जाहीर कबुली दिल्यानंतर समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत आणि त्यांनी राजीनामा द्यावा यासाठी दबाव वाढत आहे. एकीकडे यासंदर्भात राष्ट्रवादीची पक्षांतर्गत बैठक सुरू असली, तरी दुसरीकडे भाजपच्या एका नेत्याने आणि माजी आमदाराने धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या महिलेविरोधातच पोलिसांना पत्र लिहिलं आहे. यामुळे या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळू शकतं.

कृष्णा हेगडे हे माजी आमदार पूर्वी काँग्रेसमध्ये होते. ते काही वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षात सामील झाले. त्यांनी मुंबई पोलिसांना दिलेल्या एका पत्रात रेणू शर्मा नावाच्या महिलेवर ब्लॅकमेल करत असल्याचे आरोप केले आहेत. हीच महिला धनंजय मुंडेंवर बलात्काराचे आरोप करत होती. अंधेरीच्या अंबोली पोलीस स्टेशनमध्ये कृष्णा हेगडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीची प्रत News18 lokmat ला मिळाली आहे. त्यानुसार त्यांनी रेणू शर्मा आपल्यालाही सतत फोन आणि मेसेज करून तिच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत होती, असं म्हटलं आहे.

'रेणू शर्मा नावाची महिला मला 2010 पासून सतत फोन करून आणि मेसेज करून तिच्याशी संबंध ठेवावेत अशी गळ घालत होती. माझ्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ती अशा प्रकारे जाळं टाकून त्यात भुलवून  ब्लॅकमेल करते आणि पैसे लुबाडते. मी तिच्यापासून दूर राहण्यात यशस्वी ठरलो. तिला एकदाही भेटलो नाही. दोन दिवसांपूर्वी तिने धनंजय मुंडेंवर आरोप केलेले पाहिले आणि मी पोलिसांना ही माहिती देण्यासाठी पुढे आलो', असं हेगडे यांनी म्हटलं आहे.

हेगडे यांच्या पत्रानुसार, रेणू शर्माने त्यांना 6 आणि 7 जानेवारीला पुन्हा एकदा मेसेज केले होते. 'पण मी उत्तर द्यायचं टाळलं आणि फक्त इमोजी पाठवला', असंही हेगडे यांनी त्यावर म्हटलं आहे.

'ती महिला अशा प्रकारे हनी ट्रॅपिंगमध्ये अडकून अनेकांची फसवणूक करू शकते. तिने मला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला, उद्या दुसऱ्या कोणाला अडकवेल. म्हणून पोलिसांनी या प्रकरणी ब्लॅकमेलिंगची केस नोंदवून घेऊन तिच्याविरोधात FIR दाखल करून घ्यावी,' अशी विनंती हेगडे यांनी पोलिसांना दिलेल्या पत्रात केली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

धनंजय मुंडे यांच्यावर मुंबईतल्या एका महिलेने बलात्काराचे आरोप केले, त्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. तिने सोशल मीडियावर पोलीस बलात्काराची तक्रार नोंदवून घेत नाहीत, असं जाहीर केलं आणि या प्रकरणाची दखल माध्यमांमधून घेण्यात आली. बलात्कारासारखा गंभीर आरोप असल्याने राजकीय खळबळ उडाली. दुसऱ्याच दिवशी हे आरोप खोटे आहेत, असं स्पष्टीकरण देताना धनंजय मुंडे यांनी स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवरून याविषयी त्यांची बाजू मांडली.

हे स्पष्टीकरण देताना मुंडे यांनी आरोप केलेल्या महिलेच्या बहिणीशी आपले संमतीने झालेले संबंध  होते, हे मान्य केलं. तिच्यापासून आपल्याला एका महिलेपासून  दोन मुलं असल्याचंही मान्य केलं. 2003 पासून ते त्या महिलेच्या संपर्कात होते आणि आता ती त्यांना ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मुंडे यांनी केला. या प्रकरणी कोर्टात दावा दाखल केल्याची माहितीही त्यांनी दिली. एवढंच नाही तर मुलांना रीतसर माझं नावही दिलं असल्याचं त्यांनी सांगितलं.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: January 14, 2021, 4:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading