मुंबई, 24 जानेवारी : महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता, असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. प्रसार माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलंय. अडीच वर्षांचं महाविकास आघाडी सरकार असताना माझ्यावर केसेस टाकण्याचं, माझ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचं, काहीही करून मला तुरुंगात टाकण्याचं टार्गेटच त्यावेळी सीपी असलेल्या संजय पांडे यांना दिलं होतं. मी काहीही केलं नव्हतं, त्यामुळे मला संजय पांडे अडकवू शकले नाहीत. मला तुरुंगात टाकण्याचे कुठलेही प्रयत्न सफल झाले नाहीत. असंही फडणवीसांनी म्हटलंय. यामुळे आता राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीय.
दरम्यान फडणवीस यांनी केलेले हे आरोप तेव्हाचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी फेटाळून लावले आहेत. माझ्या गृहमंत्री पदाच्या काळात असा प्रकार घडलेला नाही आणि अशी कोणतीही योजना आमच्या सरकारमध्ये नव्हती. त्यांच्या माहितीच्या आधारे फडणवीस बोलले असतील.पण महाविकास आघाडी सरकारमध्ये असा प्रकार झालेला नाही, असं वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं.
तर नाना पटोलेंनी फडणवीसांचे सर्व आरोप खोडून काढले आहेत. जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचे फडणवीसांचे प्रयत्न सुरू असल्याचा टोला नाना पटोलेंनी लगावलाय.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना एनएसई फोन टॅपिंग प्रकरणात सीबीआयने अटक केली होती. मागच्याच महिन्यात संजय पांडे यांना जामीन मिळाला, यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातही संजय पांडे यांना ईडीने अटक केली होती, यातही संजय पांडे यांना दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला.
1986 सालच्या बॅचचे आयपीएस ऑफिसर असणारे संजय पांडे मागच्या वर्षी 18 फेब्रुवारीला मुंबई पोलीस कमिशनर झाले, यानंतर 30 जूनला ते निवृत्त झाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Devendra Fadnavis