मुंबई - मध्यमवर्गीय माणसाची व्याख्या मध्यमवर्गीय राजकारण्याला लागू होईल, असा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केला आहे. ट्विट करत त्यांनी शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.
शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut Property Seize By ED) यांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. राऊत यांची ११.१५ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. याबरोबर ८ भूखंड आणि मुंबईच्या दादर परिसरातील एक फ्लॅट देखील ईडीने जप्त केला आहे. 1034 कोटींच्या पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणात ईडीने ही कारवाई केली. ईडीने केलेल्या कारवाईनंतर राज्यात आमच्यासारख्या मराठी मध्यमवर्गीय माणसांवर कारवाई केली जाते, असं राऊत म्हणाले होते. यानंतर त्यांच्यावर आता अमृता फडणवीसांनी निशाणा साधला.
अमृता फडणवीस यांनी काय ट्विट केले?
मी खूप गोंधळलेली आहे - कृपया मला ‘मध्यमवर्गीय माणूस’ च्या व्याख्येसाठी मदत करा ?? आणि हीच व्याख्या ‘मध्यमवर्गीय राजकारण्याला’ लागू होते का? #महाराष्ट्र
I’m very confused - Please help me with definition of ‘Middle class man’ ?? and does the same definition apply to a ‘Middle Class Politician’ ? #Maharashtra
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) April 7, 2022
काय म्हणाले होते राऊत?
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. अलिबागमधील आठ जागा आणि दादर पूर्व येथे असलेल्या गार्डन कोर्ट इमारतीतील फ्लॅट ईडीकडून जप्त करण्यात आला आहे. ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत हे देखील आक्रमक झाले आहेत. आपल्याकडे एक रुपयाही मनी लॉन्ड्रिंग केलेला निघाल्यास आपण आपली पूर्ण प्रॉपर्टी भारतीय जनता पक्षाला दान करू, असं आव्हान संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाला दिले. केवळ राजकीय सूडापोटी आपल्यावर ही कारवाई केली जाते आहे. ही सर्व प्रॉपर्टी आपण कष्टाच्या कमाईतून उभी केली असल्याचे स्पष्टीकरण संजय राऊत यांच्याकडून देण्यात आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.