मुंबई, 29 नोव्हेंबर : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गेल्या आठवड्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या 'शिवतीर्थ' (Shivtirth) या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. या भेटीचे काही फोटो देखील समोर आले होते. त्यानंतर आगामी महापालिका निवडणुकीत (Municipal Election 2022) भाजप-मनसे युती (BJP-MNS alliance) होईल, अशा चर्चांना उधाण आलंय. देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या भेटीनंतर मनसे-भाजप युतीवर काहीच चर्चा झालं नसल्याचं सांगितलं होतं. पण आता फडणवीसांनी या भेटीदरम्यान तसेच ही भेट नेमकी कशी घडून आली? याबाबतची माहिती दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी 'न्यूज 18 लोकमत'ला आज विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीवर सविस्तर प्रतिक्रिया दिली.
"मला मुख्यमंत्री उद्धवजींनी जेवायला बोलावलं तर मी स्वत: त्यांच्या घरी जाईल. राज ठाकरे हे प्रभावी नेते आहेत. त्यांनी नवीन घर बांधलं. त्यानिमित्ताने मी त्यांना अभिनंदनाचा फोन केला. त्यावेळी त्यांनी सांगितलं की, कोविडमुळे त्यांनी काही कार्यक्रम केलेला नाहीय. पण मित्रमंडळींना घरी जेवायला बोलावतोय. त्यामुळे तुम्ही आणि वहिणी घरी जेवायला या, असं निमंत्रण त्यांनी दिलं. म्हणून मी जेवायला गेलो", असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
हेही वाचा : 'महाराष्ट्रात भाजपची सत्ता पुन्हा येईल', फडणवीसांची सत्ता स्थापनेबाबतची नेमकी भूमिका काय?
"आमच्या सगळ्या विषयांवर गप्पा रंगल्या. कारण राज ठाकरेंकडे माहिती खूप असते. त्यांना सगळ्या विषयांचं ज्ञान चांगलं आहे. त्यांच्याशी गप्पा मारायला मज्जा येते. त्यामुळे मी त्यांच्याशी गप्पा मारल्या. याचा अर्थ मी युती करण्यासाठी गेलो असा काही विषय नाही. सध्यातरी भाजप पक्षाचं मत आहे की, आम्हाला स्वत:च्या हिंमतीवर लढायला हवं. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकाबाबत युतीबाबत चर्चाच झाली नाही", असं फडणवीसांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी या मुलाखतीत आपलं शिवसेनेसोबत आता राजकीय मित्रत्व उरलेलं नाही, असं स्पष्ट केलं. "राजकारणात कुणीही मित्र होऊ शकतो. पण आता शिवसेना आणि आमच्यात जी परिस्थिती आहे ती मित्रत्वाची नाहीय. आमची वैयक्तिक मैत्री असू शकते. पण पक्ष म्हणून मैत्री नाही. शिवसेना ज्याप्रकारे वागतेय त्याच्या आधारावर मला वाटत नाही की आमची फार मैत्री होऊ शकेल. कारण हिंदुत्व आमच्यातला धागा होता. ते हिंदुत्वच त्यांनी सोडून दिलं. आता जनाब बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने उर्दू कॅलेंडर काढली जात असतील, अजान स्पर्धा घेतली जात असेल आणि त्रिपुरात न घडलेल्या घटनेवर अमरावतीत दंगा झाल्यानंतर त्याची रिअॅक्शन म्हणून जे काही झालं त्यात फक्त हिंदूंवर कारवाई होत असेल तर शिवसेनेने हिंदुत्व सोडलंय", असं मत फडणवीसांनी मांडलं.
हेही वाचा : मुख्यमंत्री अधिवेशनाला प्रत्यक्ष उपस्थित राहणार?, अनिल परब यांनी दिली माहिती
काही जणांकडून देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर टोकाची टीका केली जाते. या मुद्द्यावरही फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. "मला नक्कीच दु:ख होतं. पण शेवटी राजकारणामध्ये आपण सगळ्याच गोष्टींसाठी तयार राहिलं पाहिजे आणि सामोरं गेलं पाहिजे. आपलं दु:ख आपल्यापर्यंत ठेवलं पाहिजे. पण एक नक्की आहे की या सगळ्यामध्ये अनेकांची चेहरे उघड झाले. शेवटी अमृता फडणवीस एक वेगळं व्यक्तीमत्व आहे. त्यांच्या स्वत:चे काही छंद आहेत. त्या तो छंद जोपासतात. पण जाणीवपूर्वक ज्याप्रकारे त्यांना टार्गेट केलं गेलं. त्यातून या लोकांची पातळी आणि क्षमता लक्षात येते. त्यामुळे मी त्यावर काहीच बोलणार नाही. पण मी त्यावर एकच गोष्ट सांगतो की राजकारणात मी कधीच पातळी सोडली नाही. मी कधीच सोडणार नाही. त्या कधीच राजकारणात येणार नाहीत", असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.