मुंबई, 29 नोव्हेंबर : महाविकास आघाडी सरकारला (Maha Vikas Aghadi Government) स्थापन होऊन आता दोन वर्ष पूर्ण होत आहेत. दुसरीकडे भाजप (BJP) नेत्यांकडून हे सरकार फार काळ टिकणार नाही, असा दावा केला जातोय. भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी महाविकास आघाडी सरकार मार्च महिन्यात पडेल, असा दावा केला आहे. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी गनिमीकाव्याचा उल्लेख करत भाजपचं सरकार नक्की येईल, असा दावा केलाय. त्यानंतर आता महाराष्ट्रातील भाजपचा प्रमुख चेहरा आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या विषयावर आपली भूमिका मांडली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी 'न्यूज 18 लोकमत'ला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी राज्यातील विविध घडामोडींवर रोखठोक भूमिका मांडली.
"महाविका आघाडी सरकार हे अनैसर्गिक सरकार आहे. जनतेने भाजपला निवडून दिलं आहे. यांना निवडून दिलेलं नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना आम्ही एकत्र आहोत, असं म्हणत त्यांनी मतं मागितली आहेत का? आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने मतं मागितली. शिवसेनेने देखील मोदींच्या नावाने मतं मागितली. तर काँग्रेसने त्यांच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नावाने मतं मागितली. त्यांना लोकांनी पराभूत केलं. नंतर ही अनैसर्गिक युती झाली आहे", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हेही वाचा : मुख्यमंत्री अधिवेशनाला प्रत्यक्ष उपस्थित राहणार?, अनिल परब यांनी दिली माहिती
"आम्ही राज्यात सत्ता परिवर्तन करण्याचा कोणताही प्रयत्न करणार नाही. पण महाराष्ट्र आणि देशाच्या राजकीय इतिहासामध्ये अंतर्गत विरोधाने भरलेली सरकारे हे स्वत:च्या वजनानेच पडलेली आहेत. ते स्वत:चे अंतर्गत असलेल्या विरोधानेच पडतात. जेव्हा सरकार मजबूत वाटतं तेव्हाच ते कोसळतं. अनेकवेळा सरकार कोसळेल असं वाटतं तेव्हा ते उजवं ठरतं. या सरकारमध्ये भ्रष्टाचार हा एक असा मुद्दा आहे ज्याने या सगळ्यांना बांधून ठेवलं आहे. सगळे मिळून कशाप्रकारे महाराष्ट्राला लुटता येईल अशाप्रकारचा प्रयत्न चाललेला आहे. पण तरीदेखील ते फार काळ एकत्र राहू शकणार नाहीत. त्यांच्यावर एकवेळ अशी येईल की हे असहनीय होईल. ज्यादिवशी पडतील तेव्हा जनतेला एक पर्यायी सरकार देऊ. पण त्यादिवसाची आम्ही वाट पाहणार नाही. भाजप विरोधी पक्ष म्हणून सक्षमतेने काम करतेय. कोरोना काळ असो, दुष्काळ असो, अतिवृष्टी आणि चक्रीवादळ असो, आम्ही मैदानाच आहोत. आम्ही शिवारात, बांधारात, लोकांच्या घरी, दवाखान्यात, आयसीयूत आहोत. आम्हाला विश्वास आहे, 2024 पर्यंत आम्ही आमची जागा एवढी वाढवणार आहोत की आपल्या भरवश्यावर सरकार आणणार", अशी भूमिका फडणवीस यांनी मांडली.
हेही वाचा : परमबीर सिंग यांच्याविरुद्ध चांदीवाल आयोगाने काढलेले वॉरंट रद्द
"जनतेला तर मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार हवं होतं. या सरकारला जनतेने मत दिलं नव्हतं. अनैसर्गिक गोष्टी फार काळ टिकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे राजकारणात जोपर्यंत युती किंवा आघाडी तुटत नाही तोपर्यंत मुदत सांगता येत नाही. त्यामुळे वाट बघितली पाहिजे", असं फडणवीस यावेळी म्हणाले.
"राजकारणात कुणीही मित्र होऊ शकतो. पण आता शिवसेना आणि आमच्यात जी परिस्थिती आहे ती मित्रत्वाची नाहीय. आमची वैयक्तिक मैत्री असू शकते. पण पक्ष म्हणून मैत्री नाही. शिवसेना ज्याप्रकारे वागतेय त्याच्या आधारावर मला वाटत नाही की आमची फार मैत्री होऊ शकेल. कारण हिंदुत्व आमच्यातला धागा होता. ते हिंदुत्वच त्यांनी सोडून दिलं. आता जनाब बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने उर्दू कॅलेंडर काढली जात असतील, अजान स्पर्धा घेतली जात असेल आणि त्रिपुरात न घडलेल्या घटनेवर अमरावतीत दंगा झाल्यानंतर त्याची रिअॅक्शन म्हणून जे काही झालं त्यात फक्त हिंदूंवर कारवाई होत असेल तर शिवसेनेने हिंदुत्व सोडलंय", असं मत फडणवीसांनी मांडलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.