Home /News /maharashtra /

देवेंद्र फडणवीसांना तात्पुरता दिलासा, पुढील सुनावणीला कोर्टात हजर राहण्याचे आदेश

देवेंद्र फडणवीसांना तात्पुरता दिलासा, पुढील सुनावणीला कोर्टात हजर राहण्याचे आदेश

भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस विधानसभा निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात माहिती लपवली होती.

    नागपूर, 04 जानेवारी :  विधानसभा निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दोन फौजदारी प्रकरणांची माहिती लपवल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना CJM कोर्टाने तात्पुरता दिलासा दिला आहे.  कोर्टाने पुढील सुनावणीच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 24 जानेवारीला होणार आहे. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी  विधानसभा निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात माहिती लपवली होती. या प्रकरणी अॅड. सतीश उके यांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे. आज या याचिकेवर चीफ ज्युडिशीयल मॅजिस्ट्रेट समक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने देवेंद्र फडणवीस यांना आज न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, राज्यात जिल्हा परिषद निवडणुकांचा प्रचार सुरू आहे. शिवाय विदर्भाला अवकाळी पावसाने झोडपून काढले असल्यानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना  सरकाराकडून मदत मिळवून देण्यासाठी ते शेतकऱ्यांसोबत व्यस्त असल्याने ते आज सुनावणीला हजर राहू शकत नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांचे वकील उदय डबले यांनी सांगितलं. त्यानंतर याचिकाकर्ते सतीश उके यांच्या बाजूने आपली भूमिका मांडत असलेले अॅड. जैस्वाल यांनी आक्षेप नोंदवला. फडणवीस यांनी अनेक वेळा न्यायालयात येण्याचे टाळले असल्याने त्यांना पोलिसांच्या सुरक्षेत(अटक न करता) कोर्टात हजर करावं असा युक्तिवाद केला. मात्र, न्यायालयाने यावर कोणतेही आदेश दिले नाहीत. न्यायालयाने दोन्ही पक्षाची भूमिका ऐकून घेतल्यानंतर  देवेंद्र फडणवीस यांना 24 जानेवारीपर्यंत दिलासा दिला आहे. मात्र, 24 तारखेला उपस्थित राहण्याचे आदेश सुद्धा न्यायालयाने दिले आहे.  त्यावेळी देवेंद्र फडणवीस पुन्हा गैरहजर राहिल्यास कारवाई केली जाईल, असं देखील न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. आता 24 जानेवारी रोजी देवेंद्र फडणवीस यांना न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. काय आहे प्रकरण? माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात 1996 आणि 1997 मध्ये मानहानी, फसवणूक आणि खोट्या कागदपत्रांसंदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र, या दोन्ही आरोपांची निश्चिती झाली नव्हती. पण या गुन्ह्यांविषयीची माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्रात न लिहिल्याने नागपूरमधील वकील सतीश उके यांनी त्यांच्याविरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती. फडणवीस यांच्याविरोधात गुन्हेगारी खटला चालवण्याची वकील उके यांनी मागणी केली होती. दरम्यान, मुंबई हायकोर्टाने वकील उके यांची याचिका फेटाळून लावत फडणवीसांना दिलासा दिला होता. नंतर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर नागपूरच्या दंडाधिकारी न्यायालयाने 1 नोव्हेंबर रोजी याचिकेवर पुन्हा सुनावणीस सुरुवात केली होती. 4 नोव्हेंबरला फडणवीसांना नोटीस बजावण्यात आली होती. या नोटीशीला 4 डिसेंबरपर्यंत उत्तर देण्याचे कोर्टाचे आदेश होते. देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील आमदार आहेत. मात्र त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी त्यांच्यावर असलेल्या दोन गुन्ह्याच्या खटल्याची माहिती लपवल्याची त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Devendra Fadanvis

    पुढील बातम्या