प्रशांत लीला रामदास, नवी दिल्ली 11 जानेवारी : सत्तेत सहभागी झाल्यापासून शिवसेना विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. एक दिवसही असा गेला नाही ज्या दिवशी सामना किंवा शिवसेनेने भाजप, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारवर टीका केली नाही. आता लोकसभा निवडणुकांना फक्त 4 महिने राहिले आहेत. त्यामुळे भाजप युतीसाठी आग्रही होता तर शिवसेना उघडपणे भाजपशी जमणार नाही असं दाखवत होती. आता मात्र युतीचा 'पाळणा' हलणार असल्याचे संकेत खुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिले आहेत.
भाजपच्या महाअधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत आले आहेत. त्यांनीही शिवसेनेसोबत चर्चा सुरू असल्याचे संकेत दिले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली आहे, त्यानंतर अमित शहांसोबतही चर्चा झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. युतीचा निर्णय मुंबईत होईल असंही ते म्हणाले. त्यामुळे युतीचं आता पक्क होणार हे स्पष्ट झालंय.
दोनही पक्षांनी फार ताणून धरलं नाही तर युती निश्चित होणार हे स्पष्ट झाल्यानं राज्यातलं राजकीय गणित बदलणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करून जोमाने कामाला सुरूवातही केलीय. त्याचंही गणित युतीवर अवलंबून असल्याने युती झाली तर आघाडीलाही आपल्या डावपेचांमध्ये बदल करावे लागणार आहेत.
असा असेल युतीचा फॉर्म्युला
भाजप आणि शिवसेना यांच्यातील लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाची चर्चा पुढे सरकली असल्याची माहिती आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांनी जिंकलेल्या जागा स्वत:कडे कायम ठेवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेनं 18 तर भाजपनं 23 जागांवर विजय मिळवला होता. आगामी निवडणुकीसाठी युतीमध्ये दोन्ही पक्ष आपण जिंकलेल्या जागा स्वत:कडे ठेवून घेणार आहेत. म्हणजे युतीसाठीच्या 41 जागांबाबतचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे. याबाबत भाजप-सेनेने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र काही दिवसांपासून युतीच्या चर्चा समोर येत आहेत. त्यातच या फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती आहे.
उर्वरित 7 जागांचा निर्णय बाकी
मागील निवडणुकीत भाजप-सेनेनं मित्रपक्षांना सोबत घेत महायुती केली होती. त्यामुळे काही जागा मित्रपक्षांनाही सोडल्या होत्या. त्यामुळे हे दोन्ही पक्ष पराभूत झालेल्या आणि मित्रपक्षांना सोडलेल्या अशा एकूण 7 जागांवरील युतीची चर्चा अद्याप बाकी असल्याची माहिती आहे.
VIDEO : परिवर्तन यात्रेत अजित पवारांची बैलगाडीतून सवारी, लगाम धनंजय मुंडेंच्या हाती