'PM मोदींनी तो सल्ला दिला आणि आम्ही शिवसेनेसोबत युती केली', फडणवीसांनी पहिल्यांच केला मोठा खुलासा

'PM मोदींनी तो सल्ला दिला आणि आम्ही शिवसेनेसोबत युती केली', फडणवीसांनी पहिल्यांच केला मोठा खुलासा

भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा 2019 च्या विधानसभा निवडणुकीबाबत भाष्य केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 3 मे : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांना अनेक महिने लोटले आहेत. निवडणुकीनंतर मोठं रणकंदन झालं आणि राज्यात महाविकास आघाडीच्या रुपाने नव्या आघाडीचा जन्म झाला. 2014 साली राज्यातील सत्तेत सर्वात मोठा वाटा उचलणारा भाजप सत्तेपासून दूर गेला. आता निवडणुकीला अनेक महिन्यांचा काळ लोटला असला तरीही आरोप-प्रत्यारोप थांबवण्याचं नाव घेत नाही. अशातच भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा 2019 च्या विधानसभा निवडणुकीबाबत भाष्य केलं आहे.

विधानसभा निवडणुकीत एकत्र लढलेल्या आणि नंतर वेगळं झालेल्या भाजप-शिवसेना या दोन पक्षांचा वाटचालीबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांच एक मोठा खुलासा केला आहे. 'लोकसभेला युती केली, पण विधानसभेला पुन्हा 2014च्या धर्तीवर युती केली नाही तर भाजप हा संधीसाधू पक्ष असल्याची टीका होण्याची शक्यता होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही असा स्वार्थीपणा करू नका, असा सल्ला दिला होता. यामुळेच आम्ही युती केली,' असं देवेंद्र फडणवीस यांनी 'लोकसत्ता'च्या वेबसंवाद या कार्यक्रमात बोलताना म्हटलं आहे.

हेही वाचा - पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, घरपोच मिळणार 'ही' सेवा

2019 च्या निवडणूक निकालानंतर पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी सज्ज असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्षनेतेपद स्वीकारावं लागलं. याबाबत भाष्य करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'राज्यातील जनतेने मला पुन्हा सत्तेत आणले होते. पण राजकीय वजाबाकीने घरी बसविले व विरोधी पक्षनेतेपद स्वीकारावे लागले. जनतेचा आशीर्वाद वाया जात नाही. योग्य वेळी राज्यातील जनता मला पुन्हा सत्तेत आणेलच.'

'शिवसेनेनं पद्धतशीर राष्ट्रवादी आघाडीला मदत केली'

निवडणूक निकालानंतर झालेल्या घडामोडींबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केला आहे. 'शिवसेना आणि राष्ट्रवादीत आधीपासूनच काही पडद्याआडून समझोता झाला असावा. नंतर शरद पवार व संजय राऊत यांच्या विधानांवरून ते स्पष्टच झाले. लोकसभा निवडणुकीचा निकालाचा कल लक्षात घेता भाजपचे 120 ते 125 तर शिवसेनेचे 90 उमेदवार निवडून येतील, असा अंदाज होता. काँग्रेस-राष्ट्रवादी भुईसपाट झाले असते. पण भाजपचे जास्त उमेदवार निवडून आल्यास अपक्षांच्या मदतीने सरकार स्थापन करतील, अशी भीती शिवसेनेला दाखविण्यात आली. शिवसेनेने पद्धतशीरपणे राष्ट्रवादी आघाडीला मदत केली,' असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

संकलन, संपादन - अक्षय शितोळे

First published: May 3, 2020, 11:26 AM IST

ताज्या बातम्या