रावेर, 01 जून : सध्या संपूर्ण जगावर कोरोनाचं संकट (Coronavirus) ओढवलं आहे. कोरोनाबरोबर आपण सगळेच लढा देत आहोत. त्यामुळं महामारीच्या या संकटात सध्यातरी 'ऑपरेश लोट्स' (Operation Lotus) होणार नाही, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. तसंच शरद पवारांची (Sharad pawar) भेट ही केवळ सर्जरीनंतर त्यांच्या प्रकृतीच्या चौकशीसाठी घेतली होती असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
(वाचा-ठाकरे सरकारचा खासगी हॉस्पिटल्सना दणका, कोविड उपचारासाठी दर जाहीर)
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी जळगाव दौऱ्यावर आहेत. यादरम्यान फडणवीस यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. या दरम्यान रावेर तालुक्यातील तांदळवाडी इथं पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी अनेक विषयांवर मतं मांडली. सध्या सगळीकडं कोरोनाची बिकट परिस्थिती आहे. सगळेच कोरोनाशी दोन हात करण्यासाठी झटत आहेत. अशा परिस्थितीत राज्यात कोणतेही राजकीय बदल होण्याची शक्यता नाही. त्यामुळं कोरोनाच्या परिस्थितीचा विचार करता सध्या 'ऑपरेशन लोट्स' होणार नाही असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलं.
(वाचा-कोरोनाचा फटका! देशातील सर्वात मोठ्या बँकेतील भरती परीक्षा स्थगित, 5000 पदं रिक्त)
देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी शरद पवार यांनी त्यांच्या सिलव्हर ओक या बंगल्यावर जाऊन सदिच्छा भेट घेतली होती. या भेटीनंतर अनेक राजकीय तर्क वितर्क लावले जात होते. चर्चांना उधाण झालं होते. पण देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतही स्पष्टीकरण दिलं. शरद पवार हे राजकीय किंवा वैचारिक विरोधक असले तरी ते राज्यामधले ज्येष्ठ नेतेही आहेत. त्यांच्या तीन सर्जरी झाल्या. त्यानंतर यातून ते आता सावरले आहेत, त्यामुळं त्यांची भेट घेण्यासाठी गेलो होतो, असं फडणवीस म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संभाजीराजे छत्रपती यांनी घेतलेल्या भूमिकेवरही देवेंद्र फडणवीस यांनी मत व्यक्त केलं आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्या तोंडी अनेक घोषणा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पण त्यांनी कोणतीही राजकीय भूमिका घेतलेली नाही. तसंच त्यांनी भाजपच्या विरोधातदेखिल कोणतीही भूमिका घेतलेली नाही. संभाजीराजे हे मराठा आरक्षणासाठी लढत आहेत, त्यामुळं त्यांच्याशी विरोध किंवा वाद नसल्याचं फडणवीस म्हणाले.
जळगाव दौऱ्यादरम्यान फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली. मागच्या वर्षी झालेल्या नुकसानीचे पैसे अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. त्यात यावर्षीही नुकसान झालं आहे. कोकणामध्ये ज्याप्रमाणे नुकसान झाल्यानं आर्थिक मदत महाराष्ट्र सरकारने केली आहे, त्या धर्तीवर आम्हाला तातडीची मदत हवी आहे, अशी शेतकऱ्यांची मागणी असल्याचं फडणवीस म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Devendra Fadnavis, Jalgaon, Sharad pawar