'CBI चौकशी होईपर्यंत मुख्यमंत्र्यांनी देशमुखांचा राजीनामा घ्यावा', हायकोर्टाच्या निर्देशानंतर देवेंद्र फडणवीस आक्रमक

'CBI चौकशी होईपर्यंत मुख्यमंत्र्यांनी देशमुखांचा राजीनामा घ्यावा', हायकोर्टाच्या निर्देशानंतर देवेंद्र फडणवीस आक्रमक

'नैतिकतेच्या आधारावर महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या राजीनामा लगेच स्वीकृत करावा', अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

  • Share this:

मुंबई, 05 एप्रिल: 'नैतिकतेच्या आधारावर महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी (Home Minister of Maharashtra) राजीनामा द्यावा. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या राजीनामा लगेच स्वीकृत करावा', अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केली आहे. हायकोर्टाने परमबीर सिंग (High Court on Parambir Singh Appeal) यांची याचिका निकाली काढल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. त्याचप्रमाणे याप्रकणी मुख्यमंत्र्यांचे मौन का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी हायकोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते आहे.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'माननीय उच्च न्यायालयाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. डॉ. जयश्री पाटील यांच्या याचिकेअंतर्गत हायकोर्टाने सीबीआयला आदेश दिले आहेत की 15 दिवसांच्या आतमध्ये सीबीआयने प्राथमिक अहवाल सादर करावा. एकूणच महाराष्ट्रामध्ये हप्ते वसुलीचं काम सरकारच्या आणि सरकारमधील मंत्र्यांच्या आशीर्वादानं होत होतं किंवा सरकारच्या काही महत्त्वाच्या लोकांच्या आशीर्वादानं होत होतं. आज या संदर्भात कडक पाऊल माननीय उच्च न्यायाललायने उचललं आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो.'

(संबंधित-अनिल देशमुखांना HC चा झटका,15 दिवसात प्राथमिक चौकशी अहवाल देण्याचे CBIला निर्देश)

फडणवीस पुढे म्हणाले की, 'महाराष्ट्राच्या इतिहासाला काळीमा फासणाऱ्या या कार्यकाळाचं सत्य बाहेर येईल. सीबीआय चौकशीत कशाप्रकारे हप्ताखोरी चालली होती ते देखील बाहेर येईल. काही लोकांनी सीबीआय चौकशी होऊ नये याकरता प्रयत्न केले. रश्मी शुक्लांचं आवाहन, परमबीर सिंग यांचं पत्र या गोष्टी कशा चुकीच्या आहेत हे भासवण्याचा प्रयत्न केला गेला. त्याला माननीय उच्च न्यायालयाने जोरदार उत्तर दिलं आहे.'

यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, 'गृहमंत्री राजीनामा देत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला पाहिजे. नैतिकतेच्या आधारावर, एखाद्या मंत्र्यावर माननीय उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशी सांगितल्यानंतर, त्यातही गृहमंत्र्याविरोधात अशी चौकशी सांगितल्यानंतर त्यांनी त्या पदावर राहणं अयोग्य राहील. त्यांनी चौकशीला सामोरं जावं. त्यातून ते बाहेर पडले तर त्यांना पुन्हा मंत्रीमंडळात घेतलं जावं. त्यासाठी कुणाची ना नसेल. '

गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केवळ राजकीय मागणी राहिली नसून आता उच्च न्यायालयाने देखील चौकशीचे आदेश दिल्याने गृहमंत्र्यांचा राजीनामा उचित राहील असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Published by: Janhavi Bhatkar
First published: April 5, 2021, 1:01 PM IST

ताज्या बातम्या