उस्मानाबाद, 24 मे: सध्या राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग (Corona pandemic) वेगानं परसत आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या (Corona cases) वाढताना दिसत आहे. परिणामी याचा प्रचंड ताण आरोग्य यंत्रणेवर पडला आहे. त्यामुळे अनेक कोरोनाबाधित रुग्णांना बेड्स (lack of bed) मिळत नाहीयेत. अशा स्थितीत एचआरसीटी स्कोर 21 असतानाही आईला बेड न मिळाल्यानं एका सैनिक पुत्रानं आपल्या आईवर घरीच उपचार केले आहेत. सकारात्मक विचार ठेवून डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषधोपचार केल्यानं संबंधित जवानाच्या 65 वर्षीय आईनं कोरोना विषाणूवर यशस्वीपणे मात केली आहे.
संबंधित घटना उस्मानाबाद जिल्ह्यातील हासेगाव केज येथील आहे. येथील 65 वर्षीय बालिका यादव यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली आहे. त्याचवेळी सैन्यात नोकरी करणारा त्यांचा मुलगा रामहरी यादव सुट्टी घेऊन घरी आला होता. गावी आल्यानंतर आईला कोरोना विषाणूची लक्षणं असल्याचं रामहरी यांच्या निदर्शनास आलं. यामुळे त्यांनी नजीकच्या उपजिल्हा रुग्णालयात आईची कोरोना चाचणी केली. यानंतर रामहरी यांनी आईचा सिटीस्कॅन केला असता त्यांच्या आईचा एचआरसीटी स्कोर 21 आला. खरंतर एचआरसीटी स्कोर 15 पेक्षा अधिक असणं अत्यंत घातक समजला जातो.
आईचा एचआरसीटी स्कोर 21 असूनही रुग्णालयात बेड मिळाला नाही, त्यामुळे यादव कुटुंबीयांची चिंता वाढली होती. पण परिस्थितीशी न डगमगता सैनिक पुत्रानं स्वतःच आईवर उपचार करायचं ठरवलं. त्यांनी कळंब येथील एका डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषधोपचार करून आईवर यशस्वी उपचार केला आहे. त्यांनी सर्वप्रथम आईला शेतात विलगीकरणात ठेवलं. याठिकाणी औषधोपचारासोबतचं सकारात्मक विचार ठेवून आईला कोरोनाशी लढायला बळ दिलं.
हे ही वाचा-बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी सोडली नोकरी; पतीसोबत सुरू केली समाजसेवा
दरम्यानच्या काळात त्यांनी आईला दररोज सकाळी योगासन करायला लावली. सोबतचं अनुलोम-विलोम, कपालभाती, कोमट पाणी पिणे हे सर्व उपाय केले. सोबतचं डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या वेळेत घेतल्या. तसेच कोरोनावर मात करण्यासाठी आईला सतत आनंदी आणि सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न केला. यानंतर काही दिवसांतच सैनिक पुत्राच्या आईनं कोरोनावर यशस्वी मात केली आहे. एचआरसीटी स्कोर 21 असताना कोणत्याही वैद्यकीय सुविधा नसताना त्यांनी कोरोनावर मात केल्यानं परिसरात त्यांच्या जिद्दीचं कौतुक केलं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona patient, Indian army, Mother, Osmanabad