Home /News /maharashtra /

10 रुपयांच्या नाण्यावर खरंच बंदी येणार का? नोटबंदीनंतर नाणेबंदीच्या अफवा

10 रुपयांच्या नाण्यावर खरंच बंदी येणार का? नोटबंदीनंतर नाणेबंदीच्या अफवा

गेल्या काही दिवसात यवतमाळ जिल्ह्यात नाणेबंदीच्या अफवेनं अभूतपूर्व संभ्रमाची परिस्थिती निर्माण झालीय. जिल्ह्याभरात 10 रुपयाचं नाणं बंद होणार अशी अफवा पसरल्यानं नागरिक, बँका, दुकानदार सगळेच मोठ्या चिंतेत आहेत.

    यवतमाळ, 28 जानेवारी: मोदी सरकारनं केलेल्या नोटबंदीच्या धक्क्यातून देशातली जनता अजूनही सावरलेली नाही तोच यवतमाळमध्ये नाणेबंदीच्या चर्चेनं नागरिकांच्या पोटात गोळा आलाय. कधी 2000 रुपयांची तर कधी 500 रुपयांची नोट बंद होणार अशा अफवांचं वारंवार पेव फुटतं. लोक नोटा जमा करण्यासाठी बँकांमध्ये गर्दी करत आहेत. नोटबंदीच्या या अफवामध्ये आता भर पडलीय ती नाणेबंदीची. गेल्या काही दिवसात यवतमाळ जिल्ह्यात नाणेबंदीच्या अफवेनं अभूतपूर्व संभ्रमाची परिस्थिती निर्माण झालीय. जिल्ह्यात सगळीकडे 10 रुपयाचं नाणं बंद होणार अशी अफवा पसरल्यानं नागरिक, बँका, दुकानदार सगळेच मोठ्या चिंतेत आहेत. दहा रुपयाचं नाणं चालनातून बंद झाल्याच्या अफवेनंतर कुणीही नाणे स्वीकारायला तयार नाही. त्यामुळे एसबीआय बँकेची तिजोरी 10 रुपयांच्या नाण्यानं पूर्णपणे भरली आहे. इतक्या सगळ्या नाण्यांचं करायचं काय आणि ती ठेवायची कुठे हा सर्व बँकांसमोरचा प्रश्न आहे. कुणी नाणं घेता का नाणं? दहा रुपयांचं नाणं चलनात आलं तेव्हा त्याच्या आकर्षक डिझाईननं अनेकांना भुरळ घातली. अनेकांनी त्याचा संग्रहही केला. परिणामी ते व्यवहारात कमी दिसू लागलं. पण 10 रुपयांचं नाणं बंद झाल्याची अफवा पसरली आणि भयभीत नागरिकांनी नाणे बँकेत जमा करायला झुंबड उडाली. त्यामुळे बँकेत 10 रुपयांच्या लाखो नाण्यांनी बँकेची तिजोरी भरून गेली. शिवाय नागरीक बँकेकडून नाणे घ्यायलाही तयार नाहीत त्यामुळे बँकेची अडचण आणखीणच वाढलीय.काही ग्राहकांनी 10 रुपयांची नाणी दुकानदारांकडे सोपवली. पण आता दुकानदारांकडेही नाण्यांचा मोठा साठा जमा झाल्यानं तेही नाणी स्वीकारायला तयार नाहीत. अफवांवर विश्वास ठेवू नका! एका अफवेनं जिल्ह्यात नाण्यांच्या साठ्याची अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाल्यानं जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलंय. तसंच व्यापारी आस्थापना, किरकोळ दुकानदार आणि बँकांनी दहा रुपयाची नाणी स्वीकारावीत असे आदेश दिलेत. शिवाय नागरिकांनीही अपप्रचाराला बळी पडू नये, हे नाणे चलनात असून त्यावर रिझर्व्ह बँकेनं कसलीही बंदी घातली नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता जिल्ह्यातील नागरिकांनी बिनधास्तपणे नाणं चलनात ठेवावं असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. अन्य बातम्या भाजप आणि राष्ट्रवादीत जुंपली, आव्हाड म्हणाले धमकी कुणाला देताय? मोर्चा घुसखोरांविरुद्ध, CAA आणि NRCला समर्थन नाही - राज ठाकरे VIDEO...नाही तर बँक फोडून टाकेल, खासदार नवनीत राणा बँक अधिकाऱ्यांवर भडकल्या
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Indian coins, Notebandi

    पुढील बातम्या