जालना, 3 जानेवारी: आजपासून 15 ते 18 या वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होणार आहे. दोन दिवसांपासून कोविन (CoWIN) अॅपवर नोंदणी सुरु झाली आहे. महाराष्ट्रासह देशभरात लसीकरणाची (Child Vaccination) जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. दरम्यान, आज जालना शहरातील महिला व बाल रुग्णालयातून आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी स्वतः उपस्थित राहून मुलांच्या लसीकरणाला सुरुवात केली. यावेळी, त्यांनी 12 वर्षांमधील मुलांसाठीही लसीकरण व्हावे अशी मागणी केंद्राकडे केली असल्याचे सांगितले.
जालना येथील लहान मुलांच्या लसीकरणाला प्रारंभ झाल्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. लहान मुलांनंतर आता आता पुढील टप्प्यात 12 वर्षांच्या पुढील मुलांच्या लसीकरणाचीही मागणी केंद्राकडे करण्यात आली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
ते म्हणाले, मुलांच्या लसीकरणाची मोहीम शाळेत राबवण्याची आमची ईच्छा होती पण लसीकरणामुळे लहान मुलांना काही त्रास झाल्यास तात्काळ उपाय करणे गरजेचे आहे त्यामुळे दवाखान्यात लसीकरण केले असेही टोपे यांनी स्पष्ट केले. पण शाळेतील लसीकरणाबाबत लवकरच विचार करु असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
तसेच लॉकडाऊनसंदर्भात बोलताना म्हणाले, राज्यात ओमायक्रॉन रुग्ण वाढले असले तरी लॉकडाऊनची परिभाषा प्रत्येक राज्यात वेगळी आहे. त्यामुळे लॉकडाऊन बाबत राज्यांना समान निकष असायला हवे असे सांगत लॉकडाऊन बाबत सर्वच राज्यांना समान प्रोटोकॉल लागू करावा अशी मागणीही केंद्राकडे केली असल्याचे टोपे यांनी यावेळी म्हटले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.