औरंगाबाद, 23 जानेवारी : स्ट्रेचर उपलब्ध नसल्याने महिलेची उभ्यानेच प्रसुती झाल्याची घटना औरंगाबादच्या घाटी रुग्णायलायत घडली आहे. उभ्याने प्रसुती झाल्यानंतर बाळ खाली पडून त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं शहरात प्रशासनाविरोधात मोठा संताप पसरला आहे.
औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात गेल्या अनेक दिवसांपासून लिफ्टचा बिघाड झाला आहे. त्यामुळे तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या प्रसुतीगृहापर्यंत गरोदर महिलांना चालत जावं लागतं. चार दिवसांपूर्वी एक गरोदर महिला या घाटी रुग्णायलात आली. तिच्या पोटात कळ यायला सुरू झाली. पण तिसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी रुग्णालयात लिफ्ट बंद होती आणि स्ट्रेचरही उपलब्ध नव्हते. त्यामुळे ही महिला तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या प्रसुतीगृहाकडे जाण्यासाठी चालत निघाली. पण वर जात असतानाच तिची प्रसुती झाली. यादरम्यान, बाळ थेट फरशीवर पडल्यानंतर त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
औरंगाबादच्या घाटी रुग्णालायत प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे गेल्या अनेक दिवसांपासून लिफ्ट सुरू होऊ शकलेली नाही. त्यातच या महिलेला स्ट्रेचरचीही सुविधा मिळू शकली नाही. त्यामुळे तिच्या बाळाने हे जग बघण्याआधीच त्याचा मृत्यू झाला आहे.
चार दिवसानंतर आता ही घटना समोर आली आहे. प्रशासनाच्या कारभारामुळे एका आईला आपलं मुल गमवावं लागलं. ही घटना समोर आल्यानंतर आता सर्वसामान्यांकडून मोठा रोष व्यक्त करण्यात येत आहे. त्या लहानग्याच्या मृत्यूला जबाबदार कोण, असा प्रश्न विचारला जात आहे. हलगर्जीपणाबद्दल प्रशासनावर कठोर कारवाई होते का, हे आता पाहावं लागेल.
PUBG खेळणाऱ्या 'जवानां'नो...तुम्ही होऊ शकता मानसिक रोगी! पाहा Special Report