मावळ, 8 जून- आमराईत आंबे वेचण्यासाठी गेलेल्या 12 वर्षीय मुलीला विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना तळेगाव इंदुरी गावातील पिंजन मळा येथे घडली आहे.
पिंकी केदारी असे मृत मुलीचे नाव असून आपल्या दोन लहान भावंडांसह इंदोरी येथील पिंजण मळ्यात आंबे वेचायला गेली होती. आमराईला लावण्यात आलेल्या संरक्षण तारेमधील विद्युत प्रवाहाचा जोरदार धक्का पिंकीला बसला. तिचा जागेवरच मृत्यू झाला. तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमराईचा मालक सद्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील शव कुजण्याची भीती
पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे चालविल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील शवविच्छेदन केंद्रातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. त्यामुळे शवविच्छेदन केंद्रातील कोल्डस्टोरेजमधील मृतदेह कुजण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
शुक्रवारी रात्री पिंपरी शहरात अचानक जोरदार वादळ आले होते. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय परिसतील एक झाड कोसळले. त्यामुळे शवविच्छेदन केंद्राचा विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. या घटनेला आता तब्बल 12 तासांहून जास्त वेळ झाला आहे. मात्र अजूनही विद्युत पुरवठा जोडला न गेल्याने कोल्ड स्टोरेजमधील मृतदेह कुजण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दुसरीकडे, नवे मृतदेह घेणं बंद करण्यात आलं असून कोल्डस्टोरेजमधील मृतदेह नातेवाईकांना घेऊन जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, या बाबत चे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता वाबळे यांना विचारणा केली असता लवकरच विद्युत पुरवठा पूर्ववत केला जाईल, हे स्पष्टीकरण त्यांनी दिले. मात्र, कोल्ड स्टोरेज सुरू राहावा यासाठी पर्यायी व्यवस्था का केली नाही, या प्रश्नाला उत्तर देणे त्यांनी टाळले. या सगळ्या प्रकारामुळे शहरातील संघटनांकडून महापालिका प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
VIDEO : 'जय श्रीराम' म्हणत भाजप कार्यकर्त्यांनी फोडली पोलिसांची गाडी!