कल्याण, 10 ऑक्टोबर: रेल्वे कॅन्टीनची इमारत उभारण्यासाठी जमिनिवर भराव टाकतात मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. कल्याण वाळधुनी परिसरात ही घटना उघडकीस आली आहे. हत्या करून मृतदेह पुरल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.
हेही वाचा...आमदार धीरज देशमुख यांनी असा साजरा केला आईचा वाढदिवस, देवाकडे घातलं 'हे' साकडं
कल्याण रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या वालधुनी परिसरात रेल्वे कॅन्टीनच्या इमारतीचं काम सुरू आहे. जमिनीवर भराव टाकताना मातीत एक मृतदेह आढळून आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. रेल्वेकडून कॅन्टीनसाठी इमारत उभारण्याचे काम सुरू असून याठिकाणी शनिवारी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास भराव टाकण्याचं काम सुरू होतं. यादरम्यान हा मृतदेह आढळून आला. अज्ञात व्यक्तीनं हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी येथील मातीत मृतदेह पुरल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांनी दिली आहे.
दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत बकरी पालनाच्या व्यवसायात पैसे दुप्पट करून देतो, असं आमिष दाखवून एकाची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी दोन भामट्यांना कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांनी अटक केली आहे. तर या टोळीचा म्होरक्या अद्यापही फरार आहे.
कल्याण पश्चिमेतील भानुसागर टॉकीज जवळ हीना अपार्टमेंटमध्ये अनमोल साई ॲग्रो गोट नावाची एजन्सी होती. कमलकांत यादव व त्याचे साथीदार माधुरी देशमुख, राजेश गुप्ता, पवन दुबे हे चौघे बकरी पालनचा व्यवसाय करत होते. मुरबाड येथे गोट फार्म असुन त्यामध्ये 50 बकऱ्या असल्याबाबत लोकांना या स्कीममध्ये पैसे गुंतवणुक केल्यास एका वर्षात दुप्पट रक्कम् करून देतो असे आश्वासन देवुन त्यांचेकडुन चेकने तसेच ऑनलाईन व रोखीने पैसे स्विकारत होते. आतापर्यंत यांनी अनेक लोकांकडून जवळपास 40 लाख रुपये घेतले आहेत. काही लोकांना पैसे मिळाले नाही. याचवेळी कंपनीचा मालक कमलाकांत यादव पळून गेला. म्हणून लोकांनी कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
हेही वाचा...रिक्षा चालवून पोट भरणाऱ्या महिलेला मारहाण, ढसाढसा रडत सांगितली आपबीती
वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास ढोले यांनी तपास सुरु करत लोकांना गंडा लावणाऱ्या घाटकोपर येथील पवन दुबे याला हैदराबाद येथील हयात नगर येथून तर राजेश गुप्ता याला ओटी सेक्शन उल्हासनगर येथून अटक केली आहे. तर यांचा म्होरक्या कमलेश यादव आणि साथीदार माधुरी देशमुख हे अद्याप फरार आहेत. या अटक आरोपींकडून पोलिसांनी 6 लाख 40 हजार 800 रुपये रोख रक्कम, एक लेनोवा कंपनीचा लॅपटॉप, पॅनॉसॉनिक कंपनीचा ए सी युनिट, एक लाकडी टेबल, 4 खुर्चा असा एकूण 7 लाख 800 रुपयांचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.सदरची कामगिरी वपोनि नारायण बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. (गुन्हे) संभाजी जाधव, सपोनि देविदास ढोले, पो.ना. एस. एच. भालेराव, पो.ना एन.डी.दळवी, पो.शि. के.एन. सोंगाळ यांनी केली आहे.