सुरेश जाधव, प्रतिनिधी
बीड, 10 डिसेंबर : बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस खुनाच्या घटनेत वाढ होत असल्याची गंभीर समोर येत आहे. परळी तालुक्यात रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या स्कार्पिओ गाडीत एक व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
परळी तालुक्यातील सिरसाळा नजिक असलेल्या कावळेचीवाडी-म्हातारगाव रोडवर ही घटना घडली. एका स्कार्पिओ गाडीमध्ये रक्ताने माखलेला मृतदेह आज सकाळी आढळून आला. रस्त्याच्याकडेला गाडी उभी असून गाडीमध्ये कुणीही नसल्याने परिसरामध्ये एकच खळबळ उडाली होती. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा मयत हा विजय सखाराम यमगर (वय 30 रा.दगडवाडी ता.परळी) रहिवासी आहे असं समोर आलं.
कावळेचिवाडी-म्हातारगाव रोडवर रस्त्याच्याकडेला रात्रीपासून एक स्कार्पिओ (एमएच-24 व्ही-5148) उभी होती. सकाळी शेतात जाणार्यांनी या गाडीमध्ये डोकावून पाहिले. मात्र, गाडीत कुणीच दिसले नाही. पाठीमागच्या सिटवर रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला. या प्रकरणी पोलिसांना माहिती दिली असता पोलीस उपअधीक्षक राहुल धस आणि परळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पूर्ण शर्ट रक्ताने माखलेला असून डोक्यामध्ये शस्त्राने वार करण्यात आले आहेत. ही हत्या का आणि कशासाठी करण्यात आली याबद्दल अजूनही कोणतीही माहिती मिळू शकली नाही. या प्रकरणाचा पोलीस अधीक तपास करत आहे.
पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून ठेवले फ्रीजमध्ये!
तर दोनच दिवसात वेगवेगळ्या खुनाच्या घटनांनी बीड जिल्हा हादरला. माजलगाव शहरातील अशोकनगर भागात सोमवारी सकाळी नाल्याच्या कडेला अर्धवट जळालेला मानवी सांगडा आढळून आल्याने खळबळ उडाली. पतीनेच राहत्या घरात पत्नीची नऊ दिवसांपूर्वी निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवल्याचे आढळून आले. आरोपी पतीने सोमवारी कमरेपासून वरचा उरलेला अर्धवट सांगाडा नाल्याच्या काठावर जाळून नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अर्धवट जळलेल्या सांगाडयामुळे ही हत्या उघड झाल्याचे समोर आले.
रेश्मा संजय साळवे असं हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तर संजय रंगनाथ साळवे उर्फ अब्दुल रहमान असे आरोपी पतीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीच्या घरातील फ्रीजमध्ये ठेवलेले रेश्माच्या शरीराचे इतर तुकडे जप्त केले आहेत. या घटनेने माजलगाव शहर हादरून गेले आहे.
मिळालेली माहिती अशी की, संजय काही काम करत नाही, यावरून पती-पत्नीमध्ये कायम वाद होत होते. 19 नोव्हेंबरला दोघांचे कडाक्याचे भांडण झाले. संतापलेल्या संजयने हे टोकाचे पाऊल उचलले. मृत रेश्मा हिने 26 नोव्हेंबर रोजी माझ्यासह मुलांना पतीपासून धोका असल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दिली होती. मात्र, पोलिसांनी त्यावर कोणतीही कारवाई न केल्याने अखेर रेश्माला आपला प्राण गमवावा लागला, असा आरोप नातेवाईकांनी केला.
माजलगाव शहरात अशोकनगर भागात राहणाऱ्या संजय साळवे व रेश्मा पठाण यांचे कॉलेज जीवनापासून प्रेम होते. त्यांनी घरच्या मंडळींच्या विरोधात जाऊन लग्न केले होते. संजय याने मुस्लिम धर्म स्वीकारला होता आणि अब्दुल रहमान या नावाने रहात होता. या दाम्पत्यास एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
भावाने केली भावाची दगडाने ठेचून हत्या
दोन दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील ममतापूर पाटोदा इथं सख्ख्या भावाने भावाची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. विलास मोहन यशवंत ( 50 ) असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. अंबाजोगाई तालुक्यातील ममदापुर पाटोदा येथे दोन सख्ख्या भावांमध्ये किरकोळ कारणावरून भांडण झाले विकोपाला गेला की, एका भावाने दुसऱ्याच्या डोक्यात दगड घातला आणि त्याची हत्या केली. पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली आहे.