Home /News /maharashtra /

शेतकऱ्यांच्या मातीत कोण कालवतंय 'विष'? MIDCतील रसायनयुक्त पाणी हायवेवरून थेट शेतात सोडलं

शेतकऱ्यांच्या मातीत कोण कालवतंय 'विष'? MIDCतील रसायनयुक्त पाणी हायवेवरून थेट शेतात सोडलं

'हार्मोनी ऑरगॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीच्या परिसरातून तर प्रदुषित पाण्याचा भलामोठा लोट थेट जवळच असलेल्या पुणे सोलापूर हायवेवर वाहत जात आहे.

    सुमित सोनवणे, दौंड, 31 जुलै : दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील औद्योगिक वसाहत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण काही रासायनिक कंपन्यांनी आपले रसायन मिश्रीत दुषित पाणी उघड्यावर सोडले आहे. काळे आणि तेलकट तवंग आलेले हे पाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट हायवेवर सोडण्यात आलं आहे. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे. मात्र या गलथानपणाचा सर्वात मोठा फटका बसला आहे तो या भागातील शेतकऱ्यांना. प्रदुषित पाणी थेट शेतजमीनीत जात असल्याने या परिसरातील शेतकरी उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहे. 'हार्मोनी ऑरगॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीच्या परिसरातून तर प्रदुषित पाण्याचा भलामोठा लोट थेट जवळच असलेल्या पुणे सोलापूर हायवेवर वाहत जात आहे. पाऊस पडताच हे घातक पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात जात आहे. यामुळे शेतजमीन तर नापीक होत आहेच, पण आरोग्याचेही गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या आयुष्यात हे विष कालवतंय कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रदुषणाबाबत आम्ही 'हार्मोनी ऑरगॅनिक्स'च्या व्यवस्थापनाशी संपर्क साधला. त्यावर कंपनीकडून सांगण्यात आलं की, 'आमची कंपनी प्लॉटच्या शेवटी असल्याने इतर कंपन्यांचं पाणीही आमच्याच भागात येते. हे प्रदुषण रोखण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.' कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योग धंदे सुरू झाल्यावर आपल्या व इतर मुलांना येथील विविध कंपन्यात कायम स्वरूपी नोकऱ्या मिळतील तसेच परिसरात आर्थिक सुबत्ता येईल, या आशेने असंख्य शेतकऱ्यांनी सन 1989 ला आपल्या जमिनी औद्योगिक क्षेत्रासाठी दिल्या. यानंतर येथे वेगवेगळ्या कंपन्यांची उभारणी झाली.पण याभागातील शेतकरी मात्र आता मेटाकुटीला आला आहे. व्यथा, वेदना आणि आंदोलनाचा इशारा 'तुम्ही कमावता पैसे तिकडं..पण आम्हाला इथं मरायचं आलंय...दवाखान्यात जाऊन जाऊन आम्ही त्रस्त झालोय. जनावरं आणि कोंबड्याही या पाण्यामुळे आजारी पडू लागले आहेत. आम्हाला पिण्याचं पाणीही आता विकत घेऊन प्यावं लागत आहे,' असं म्हणत कुरकुंभ परिसरातील एका वृद्ध शेतकरी महिलेने आपल्या वेदना मांडल्या आहेत. या परिसरातील तरुण पीढी मात्र या जाचाविरुद्ध आता आवाज उठवू लागली आहे. या परिसरातील तरुणांनी आक्रमक होत आता आंदोलनाचा इशारा दिला आहे. आगामी काळात कंपनीविरोधात आम्ही मोठा लढा उभारू, असा इशारा या परिसरातील तरुण स्वप्निल शितोळे याने दिला आहे. शेतकरी पूर्णपणे उद्धवस्त होण्याची वाट पाहिली जात आहे? उघड्यावर सोडले जाणारे पाणी सरळ शेतकऱ्यांच्या शेतात जाते. तरी देखील प्रदूषण नियंत्रण मंडळाला उघडया डोळ्याने हे दिसत नाही का? असा प्रश्न परिसरातील नागरिक विचारत आहेत. प्रदूषण मंडळाच्या कारभाराचा फायदा घेत या रासायनिक कंपन्या सर्रासपणे महामार्गावर केमिकल युक्त पाणी सोडत आहेत. या सगळ्याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ मात्र तक्रारींची वाट पाहत वेळ मारून नेण्याचे काम करत आहे आणि त्याच मुळे संबंधितांवर कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. सध्या या कंपन्यांकडून उघड्यावर सोडण्यात येणारे हे घातक पाणी चारीतून खळाळत थेट शेतजमीन आणि विहिरीत जात आहे. त्यामुळे अशा विविध कारणांमुळे कुरकुंभ, पांढरेवाडी यासह इतर परिसरात कायमच प्रदुषण सुरू आहे. कुरकुंभ औद्योगिक वसाहतील काही कंपन्यांकडुन मोठ्या प्रमाणात वायु व जल प्रदूषण होत आहे. या संदर्भात वारंवार जिल्हाधिकारी तसेच प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारी करूनही प्रदुषण रोखण्यासाठी ठोस उपाय योजना होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आगामी काळात हे प्रदूषण रोखण्यासाठी काही पाऊलं उचलली जातात की व्यवस्थेकडून शेतकरी पूर्णपणे उद्धवस्त होण्याची वाट पाहिली जाते, हे पाहावं लागेल. संपादन - अक्षय शितोळे
    Published by:Akshay Shitole
    First published:

    पुढील बातम्या