मुंबई, 5 ऑक्टोबर : दसरा मेळाव्यानिमित्त मुंबईतलं राजकीय वातावरण तापलं आहे. यावेळी पहिल्यांदाच मुंबईत दोन दसरा मेळावे होत आहेत. दादरच्या शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचा तर वांद्र्याच्या बीकेसी मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा होईल. या दोन्ही कार्यक्रमांसाठी महाराष्ट्रातून दोन्ही गटांचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यात स्टेजवर एक खास खूर्ची ठेवण्यात येणार आहे. या खूर्चीवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना विशेष स्थान देऊन मानवंदना देण्यात येणार आहे.
याआधी उद्धव ठाकरे यांनी मुंबईमध्ये शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा घेतला होता. या मेळाव्यामध्ये संजय राऊत यांच्यासाठीही खास खूर्ची ठेवण्यात आली होती. संजय राऊत हे सध्या पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणातल्या आरोपांखाली आर्थर रोड जेलमध्ये आहेत. उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातही संजय राऊत यांच्यासाठी स्पेशल खूर्ची ठेवण्यात येणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
दसरा मेळाव्यातही शिंदे धक्का देणार?
एकनाथ शिंदे दसरा मेळाव्यातही उद्धव ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत आहेत. दसरा मेळाव्याला शिंदेंकडे शिवसेनेचे आणखी 2 खासदार आणि 5 आमदार येतील, असा खळबळजनक गौप्यस्फोट शिंदेंसोबत असलेले खासदार कृपाल तुमाने यांनी केला. या दोन खासदारांपैकी एक खासदार मुंबईचा आणि दुसरा मराठवाड्याचा असेल, असा दावाही तुमाने यांनी केला.
शिंदे गटात आता कोणते आमदार-खासदार दाखल होणार? ही नावं चर्चेत
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cm eknath shinde, Shivsena