रायगड, 17 मे : तौक्ते चक्रीवादळचा (Cyclone Tauktae) रायगडला (Raigad) मोठा फटका बसला आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी घरं आणि झाडांची पडझड झाली आहे. आज सकाळी भिंत कोसळून एका भाजीविक्रेत्या महिलेचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत जखमी असलेल्या दुसऱ्या महिलेचा सुद्धा मृत्यू झाला.
आज सकाळी उरणमध्ये भाजी विक्री करण्यासाठी बसलेल्या दोन महिलांच्या अंगावर भिंत कोसळली. यात नीता नाईक यांचा मृत्यू झाला होता. तर सुनंदा घरत या जखमी झाल्या होत्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान, त्यांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर एका प्राण्याचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
तौक्ते चक्रीवादळाचा प्रभाव रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर मध्यरात्रीनंतर सर्वत्र सोसाट्याचा वारा व मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. एकूण 23.42 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आता समुद्राला भरती असल्यामुळे मोठं मोठ्या लाटा दिसायला लागल्या आहेत. जिल्ह्यातील 839 घरांचे अंशत: नुकसान झाले आहे.
पोलादपूर आणि श्रीवर्धनमध्ये घरांचे नुकसान झाले आहे आणि पेण एसटी डेपोमध्ये सकाळी चक्रीवादळामुळे एसटी बसवर झाड पडून मोठीहानी झाली आहे. अलिबाग समुद्र किनाऱ्यावर बांधलेले शेडही उडून गेले आहे. समुद्र किनाऱ्यावर अजून वारा वेगाने वाहतोय 11 तास उलटून गेले तरीही वारा पाऊस कायम आहे.
प्राथमिक माहितीनुसार, पाच घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर 181 घरांना किरकोळ बाधा झाली आहे. या वादळात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 7,866 नागरिकांना सुस्थळी प्रशासनाने हलविले आहे. तसेच जिल्ह्यातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील विविध मार्गावर 12 मोठी झाडे पडली होती जी आता मार्गावरुन हलवून रस्ते मोकळे करण्यात आले. श्रीवर्धन व मुरुड तालुक्यातील विज पुरवठा खंडीत झाला आहे. तर रोहा, महाड व अलिबाग येथे काही ठिकाणी विज प्रवाह खंडीत करण्यात आला आहे. महाड व पोलादपूर येथे अनेक ठिकाणी पडलेले पोल उभे करुन विज प्रवाह सुरू करण्यात यश आले आहे.
जिल्ह्यातील समुद्रकिनारी राहणाऱ्या 7 हजार 866 नागरिकांचे स्थलांतरण झाले पूर्ण
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील समुद्र किनारी राहणाऱ्या आतापर्यंत 7 हजार 866 नागरिकांचे स्थलांतरण पूर्ण झाले आहे.
अलिबाग-605, पेण-193, मुरुड-1067, पनवेल-168, उरण-451, कर्जत-45, खालापूर-176, माणगाव- 1309, रोहा- 523, सुधागड-165, तळा- 135, महाड-1080, पोलादपूर- 295, म्हसळा- 496, श्रीवर्धन- 1158 या ठिकाणातील एकूण 7 हजार 866 लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.