उल्हासनगर, 17 मे : तौक्ते चक्रीवादळामुळे (Cyclone Tauktae) मुंबईसह उपनगरात पावसाने धुमशान घातले आहे. ठिकठिकाणी झाडं उन्मळून पडली आहे. उल्हासनगरमध्ये एका चालत्या रिक्षावर झाड कोसळल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी आहेत.
कॅम्प 5 च्या गांधी रोड तहसीलदार या मुख्य रस्त्यावर ही दुर्घटना घडली आहे. या ठिकाणाहून एक रिक्षा प्रवाशांना घेऊन जात असताना सोसाट्याच्या वाऱ्यामुळे एक भलेमोठे झाड उन्मळून या रिक्षावर पडले. त्यामुळे रिक्षातील प्रवासी यात गंभीर जखमी झाले. त्यातील लखुमल कामदार या प्रवाशांचा जागीच मृत्यू झालाय तर रिक्षा चालक सुनील मोरे आणि अन्य एक प्रवासी त्यामध्ये गंभीर जखमी आहे.
हे झाड विजेच्या तारांवर देखील कोसळल्याने परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. सध्या अग्निशमन दलाकडून हे झाड बाजूला करण्याचे काम सुरू असून जखमींना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारार्थ पाठवण्यात आले आहे.
रायगडमध्ये 2 महिलांचा मृत्यू
दरम्यान, तौक्ते चक्रीवादळचा रायगडला (Raigad) मोठा फटका बसला आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी घरं आणि झाडांची पडझड झाली आहे. आज सकाळी भिंत कोसळून एका भाजीविक्रेत्या महिलेचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत जखमी असलेल्या दुसऱ्या महिलेचा सुद्धा मृत्यू झाला.
आज सकाळी उरणमध्ये भाजी विक्री करण्यासाठी बसलेल्या दोन महिलांच्या अंगावर भिंत कोसळली. यात नीता नाईक यांचा मृत्यू झाला होता. तर सुनंदा घरत या जखमी झाल्या होत्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान, त्यांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर एका प्राण्याचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.