मुंबई, 21 नोव्हेंबर : राज्यात सध्या सत्ता स्थापनेच्या तिढ्यावरून राजकीय घडामोडीं वेगात घडतायत. सत्तेची मोट हाकण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रयत्नात आहे. अशात विधानसभेत बहुमत मिळालं असतानाही भाजप मात्र एकटं पडलं आहे. मुख्यमंत्री पदावरून युतीचा 25 वर्षांचा संसार तुटला. शिवसेनेचे केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत यांनी भाजपवर टीका करत राजीनामा दिला. त्यानंतर भाजपने शिवसेना खासदारांनाही विरोधी बाकावर बसवलं. राज्यसभेत आसनव्यवस्था बदलल्यामुळे संजय राऊत नाराज झाले होते. त्यांनी यावर राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांना पत्रही पाठवलं होतं. त्यावरच आता माजी खासदार निलेश राणे यांनी ट्वीट करून जोरदार टीका केली आहे.
संजय राऊत यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करत निलेश राणेंनी राऊतांवर टीकास्त्र डागलं. याआधीही त्यांनी संजय राऊतांवर खळबळजनक टीका केली होती. 'तिसऱ्या रांगे वरून पाचव्या रांगेत बसवला म्हणून परत रडायला लागला. 2019 चा "रड्या ऑफ द ईयर अवार्ड" संज्यालाच दिला पाहिजे. मी कुठे बसतो त्यापेक्षा त्या पदाचा उपयोग देशाला कसा होईल हा विचार पाहिजे पण याचं राजकारण म्हणजे मी, मला आणि मीच.' अशा शब्दात निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली होती.
दरम्यान, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी बुधवारी दिल्लीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या झालेल्या बैठकीत शिवसेनेला पाठिंबा देण्यावर एकमत झाले. मात्र, काही अटीही ठेवण्यात आल्या आहेत. त्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करून पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. 'हम बुरे ही ठीक है, जब अच्छे थे तब कौनसा मेडल मिल गया था...!!' अशा शब्दांत संजय राऊत यांनी भाजपला चिमटा काढला आहे.
Loading...— Sanjay Raut (@rautsanjay61) November 21, 2019
इतर बातम्या - शिक्षकाने तरुणीला पाठवला अश्लील मेसेज, मनसेनं अर्धनग्र धिंड काढत शिकवला धडा!
गुरुवारी पुन्हा बैठक...
राज्यात शिवसेना-भाजपचा सत्ता संघर्ष आता विकोपाला गेला आहे. त्यामुळे राज्यात 'महाशिवआघाडी' या नव्या समीकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेशी घरोबा करून भाजपला खिंडीत पकडण्यासाठी रणनीती आखत आहे. यासाठी पुन्हा एकदा महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सकाळी 10 वाजता स्वतंत्र बैठक तर दुपारी 2 वाजता संयुक्त बैठक पार पडणार आहे. बुधवारी दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सकारात्मक बैठक झाली असून सेनेच्या नेत्यांच्या संपर्कात आहोत, असे स्पष्ट केले आहे. तर आता पेढ्यांची ऑर्डर देण्यास काही हरकत नाही, असे सांगत मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असा पुनरुच्चर संजय राऊत यांनी केला आहे. सत्ता स्थापनेसंदर्भात संपूर्ण चित्र 22 नोव्हेंबर संध्याकाळपर्यंत स्पष्ट होणार असल्याचेही सूत्रांकडून समजते. लवकरच शिवसेना- राष्ट्रवादी- काँग्रेसचे स्थिर सरकार येईल, अशी काँग्रेसकडून सांगितले जात आहे.
बुधवारी सत्ता स्थापनेसंदर्भात शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी येत्या 25 किंवा 26 नोव्हेंबरला शपथग्रहण समारंभ होऊ शकतो असा दावा केला होता. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या सर्व 56 आमदारांना मुंबईत बोलावलं आहे. आमदारांना आपल्यासोबत पॅनकार्ड आणि पाच-सहा दिवसांच्या राहण्याच्या तयारीनं बोलावण्यात आल्याची माहिती सत्तार यांनी दिली आहे. तर शुक्रवारी शिवसेनेच्या नेत्यांची मातोश्रीवर बैठक पार पडणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे घोषणा करणार आहेत असंही सांगितलं जात आहे. त्यामुळे आजच्या बैठकांकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर उद्या संध्याकाळपर्यंत सत्ता स्थापनेचा मार्ग खरंच मोकाळ होणार की पुन्हा हा पेच कायम राहणार याबाबत उत्सुकता आहे. त्यामुळे आज आणि उद्या घडणाऱ्या घडामोडींकडे सर्वांचं लक्ष आहे.
दिल्लीत बुधवारी झालेल्या बैठकीत सोनिया गांधींनी शिवसेनेला काही अटी घातल्या आहेत. त्या अटी मान्य केल्या तरच काँग्रेस शिवसेनेला सरकार स्थापनेत पाठिंबा देणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे शिवसेना त्या अटी मान्य करणार का? की पुन्हा एकदा सत्ता स्थापनेसाठी नवी जुळवाजुळव करावी लागणार? हे चित्र पुढच्या 48 तासांत स्पष्ट होणार आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा