महापुरानं घेतला दाम्प्त्याचा जीव, आई-वडिलांचं छत्र हरपल्यानं अनाथ झाली 5 मुलं

महापुरानं घेतला दाम्प्त्याचा जीव, आई-वडिलांचं छत्र हरपल्यानं अनाथ झाली 5 मुलं

हळूहळू पाणी वाढत असल्याने रुपचंद हे पत्नीला आणि घरी असलेल्या शेळ्यांना परत आणण्यासाठी गेले होते. पण ते परत आलेच नाही.

  • Share this:

प्रवीण तांडेकर, (प्रतिनिधी)

भंडारा, 1 सप्टेंबर: भंडारा जिल्ह्यात आलेल्या पुरात एका दाम्पत्याचा राहत्या घरातच अडकून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. भंडारा-वरठी मार्गावरील गणेश नगरजवळ मेहंदी पुलाला लागून असलेल्या एका घरात या दाम्पत्याचा मृतदेह आढळून आला आहे. रुपंचद सदाशिव कांबळे (वय-55) आणि रत्नमाला रुपचंद कांबळे (वय-45) अशी मृत पती-पत्नीची नावं आहेत. या दाम्पत्याला 5 मुले आहेत. आई-वडिलांचं अकाली छत्र हरपल्यानं ही मुलं अनाथ झाली आहेत.

हेही वाचा.. प्रकाश आंबेडकरांच्या आंदोलनानंतर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीनं घेतला मोठा निर्णय

मिळालेली माहिती अशी की, या भागात तीन दिवसांपासून पुराचं पाणी होते. मंगळवारी पाणी ओसरल्यानंतर ही घटना समोर आली आहे. पुराचं पाणी घरात शिरल्यानंतर रुपचंद कांबळे आणि त्यांच्या मुलांना बाहेर काढण्यात आले होतं. मात्र, त्यांची पत्नी रत्नमाला या घरातच अडकून पडल्या होत्या. त्यामुळे रुपंचद हे पत्नीला आणायलासाठी गेले होते. मात्र, तेही परत आले नाही. अखेर तिसऱ्या दिवशी पती-पत्नीचा राहत्या घरात मृतदेह आढळून आले.

भंडारा शहराच्या बाहेर असलेल्या हा भाग शनिवारी आलेल्या पुराच्या पाण्यात पूर्णपणे बुडालेला होता. या भागामध्ये जवळपास दहा किलोमीटर अंतरावर पाच ते सहा फूट पाणी साचलेले होते. हे कांबळे दांपत्याच्या ज्या घरी राहत होते तो भाग पुनर्वसनमध्ये गेलेला होता. या भागातील जवळपास वीस फूट खोल माती खोदून शहराला बांधलेल्या आवर भिंतीमध्ये घातली गेली होती. मात्र, तिथे असलेल्या एका छोट्याशा घरात कांबळे दाम्पत्यांनी आपला संसार या घरात थाटला होता. बरेचदा त्यांना इथून त्यांना बाहेर काढण्यात आलं, मात्र दरवेळेस ते पुन्हा त्या घरी परत आले. पावसाळ्यामध्ये या घरा सभोवताली असलेल्या खोलगट भागांमध्ये पाणी साचलेला असते. त्यामुळे हा परिसर अतिशय धोकादायक होता. पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर कांबळे दाम्पत्यांना तिथून काढलं जात होतं.

शनिवारी पुराचे पाणी वाढतांना पाहून रूपचंद कांबळे यांनी त्यांच्या पाचही मुलांना त्यांच्या नातेवाईकाकडे नेऊन सोडलं. मात्र, पत्नी हट्ट करून त्याच घरी थांबली. हळूहळू पाणी वाढत असल्याने रुपचंद हे पत्नीला आणि घरी असलेल्या शेळ्यांना परत आणण्यासाठी गेले होते. पण ते परत आलेच नाही.

हेही वाचा.. उपासमारीमुळे 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, आई 3 दिवस होती जवळ

मंगळवारी पूर ओसरल्यानंतर या परिसरात दुर्गंधी पसरली होती. नागरिकांनी जाऊन पाहिले असता दोन शेळ्या आणि कांबळे दाम्पत्य मृतावस्थेत आढळून आलं. जीव वाचण्याची संधी मिळाली असतानाही रत्नमाला यांनी घर नं सोडण्याच्या जिद्दीमुळे तिच्यासह पतीचा मृत्यू झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र, या दुर्दैवी घटनेमुळे त्याचे पाचही मुले अनाथ झाली आहेत.

Published by: Sandip Parolekar
First published: September 1, 2020, 6:46 PM IST

ताज्या बातम्या