पिंपरी चिंचवड, 24 मार्च : महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. तर दुसरीकडे पिंपरी चिंचवडमधील नागरिकांसाठी थोडी दिलासादायक बातमी आहे. पिंपरी चिंचवडमध्ये मागील 3 दिवसांत एकाही कोरोनाबाधित नवीन रुग्णाची नोंद झाली नाही.
त्यामुळे नागरिकांनी अधिक काळजी घेऊन घरातच थांबलं तर कोरोना पसरण्याची साखळी तोडण्यात त्यांना पूर्णतः यश येऊ शकते असा विश्वास व्यक्त केला जात असून नागरिकांना घरीच बसून राहण्याचं आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी केलं आहे.
हेही वाचा - मुंबईने करून दाखवले; कोरोनाचे 12 रुग्ण झाले बरे, लवकरच डिस्चार्ज
दरम्यान पिंपरीमधील ज्या कोरोनाबाधित 12 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यांचीही प्रकृती स्थिर असून त्यापैकी शहरात आढळेल्या पहिल्या 3 कोरोनाबाधितांवर आज उपचाराचे 14 दिवस पूर्ण झाले आहे. मात्र, आज पुन्हा एकदा त्यांच्या घशातील द्रव्यांचे नमुने तपासणी पाठवले जाणार आहेत, असंही पाटील ह्यांनी सांगितलंय.
पिंपरी चिंचवडमध्ये आतापर्यंत 900 पेक्षा अधिक लोकांना होम क्वॉरटाइन करण्यात आलं आहे. त्या सर्व नागरिकांना इतरत्र कुठेही फिरू नये असं आवाहनही पाटील यांनी केलं आहे.
दरम्यान, पुण्यापाठोपाठ पिंपरी शहरातही अत्यावश्यक सेवा वगळून खासगी वाहनांना वाहतुकीसाठी बंदी घालण्यात आली आहे. राज्य सरकारद्वारे लागू करण्यात आलेली संचारबंदी न पाळणाऱ्या नागरिकांवरही पोलीस लक्ष ठेवून आहे. तसंच, कलम 188 च्या आदेशाचं पालन न करणाऱ्या आणखी 15 दुकानदारांविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.