शिर्डी, 02 एप्रिल : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. भारतातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वाधित रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहे. आता कोरोना विरोधात लढण्यासाठी आता ग्रामीण भागही सज्ज झाला आहे. साईबाबांच्या शिर्डीतली डॉक्टरांनी अत्याधुनिक रुग्णालय उभारले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा ग्रामीण रुग्णालयाने अवघ्या सहा दिवसात अत्याधुनिक सुविधांनी युक्त असे 100 खाटांचे सुसज्ज रूग्णालय उभारले आहे. प्रशिक्षित स्टाफ आणि डॉक्टरांची टीम कोरोनाचा सामना करण्यासाठी सज्ज झाले असून जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या परवानगी नंतर हे हॉस्पिटल सुरू होणार आहे.
प्रवरा ग्रामीण रुग्णालय आणि प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस गेली 45 वर्ष ग्रामीण भागात आरोग्य सेवेत कार्यरत आहे. पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांनी ग्रामीण भागातील लोकांना आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून सुरू केलेले हे रुग्णालय नगर, नाशिक, औरंगाबाद, बीड तसेच इतर जिल्ह्यातील गरीब गरजू रुग्णांसाठी आरोग्य सेवेचे कार्य करत आहे.
हेही वाचा - VIDEO कोरोनाला रोखण्यासाठी नागपूरच्या डॉक्टरने तयार केला ‘सेफ्टी बॉक्स'
देशात ग्रामीण भागात सेवा देणारे तंत्रज्ञानाने परिपूर्ण असे एकमेव रुग्णालय म्हणून प्रवरा ग्रामीण रुग्णालयाची ओळख आहे. सामाजिक बांधिलकीतून ‘कोविड-19’ हॉस्पिटल त्यांनी उभारले आहे. अवघ्या सहा दिवसात डीएड कॉलेजच्या जागी सुसज्ज रूग्णालय तयार करण्यात आले आहे.
'100 रूग्णांना आयसोलेशन बेड तयार करण्यात आले असून 6 आयसीयू युनिट सज्ज आहेत. खरंतर हे रूग्णालय आम्ही सुरू करत असलो तरी यात कोणताही रूग्ण येवू नये', अशी अपेक्षा डॉ.राजेंद्र विखे यांनी व्यक्त केली. 'लोकांनी लॉकडाउनचे पालन करावे आणि कोरोनामुक्त राहावे अशीही विनंती त्यांनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.