आईच्या जाण्याचे दुःख बाजूला ठेऊन त्याने बजावले भरतमातेप्रती कर्तव्य..! करोनाच्या विषाणूची धास्ती जगव्यापी झाली आहे. करोनाने भारतातही हातपाय पसरायला सुरुवात केली आणि उभा देश या जीवघेण्या आपत्ती विरोधात लढण्यासाठी एकसंध झालाय. त्याचेच प्रतिबिंब अभूतपूर्व अशा जनता कर्फ्युच्या रुपात दिसून आले. सारं सारं काही विसरून लोक एक झालेत, द्वेष, मत्सर आणि तथाकथित कसल्याशा आपमतलबीपणाच्या सर्वच भिंती उद्धवस्त झाल्या आणि माणुसकीची एक भिंत उभी राहिली.. भली मोठी आणि भक्कम. या भक्कमपणाची ताकद आहे ती आरोग्य आणि पोलीस प्रशासन यंत्रणा. ही ताकद किती महत्वपूर्ण याचा अनुभव मी माझ्या घरातील घटनेतून घेतला. माझ्या आत्या श्रीमती जयश्री अशोकराव भोसले यांचे रविवारी निधन झाले. त्यांचे वास्तव्य भुईंजलाच होते. माझे चुलतभाऊ रामदासबापू यांच्या त्या सख्ख्या आत्या आणि त्यांच्याच घरी त्यांचे वास्तव्य. सरुआत्या म्हणून त्या सर्वपरिचित. तर सरुआत्या ठणठणीत होत्या. अगदी सकाळीच त्या घरी आल्या होत्या. न्यायाधिश झालेला आमचा पुतण्या चि. ऋषिकेश याला शोधत होत्या. त्यावेळी पत्नी सौ. वनिता आणि त्यांचे बोलणेही झाले. आणि त्यानंतर काही तासातच सरूआत्या गेल्या असे समजले. सारंच अकल्पित, धक्कादायक. हा धक्का त्यांचा मुलगा आणि उंब्रज पोलीस ठाण्यातील कर्मचारी अभयसिंह अशोकराव भोसले यांच्यासाठी किती मोठा याची कल्पनाही करवत नाही. मात्र अभयसिंह यांनी स्वतःच्या आईच्या जाण्याचे दुःख हलाहल पचवावे तसे पचवले.. पचवावेच लागले. कारण प्रथमच देशात निर्माण झालेली अभूतपूर्व परिस्तिथी हाताळन्याच्या मोहिमेतील तो एक सैनिक आहे. आणि पोलीस दलातील हा लढवय्या सैनिक या परिस्थितीत आपल्या लढाऊ बाण्याने कार्यरत राहिला. आपले अश्रू पुसून, आपले स्वतःचे दुःख गिळून तो स्वतःचे कर्तव्य बजावत राहिला. कुठून एवढं बळ आलं त्यांच्या अंगी? कोणताही पहाड थिटा पडावा एवढी उंची आणि ताकद त्यांच्या कर्तव्यभावनेने दाखवली. स्वतःच्या आईचे निधन झाले तरी भारतमातेची सर्व लेकरं सुरक्षित रहावी यासाठी अभयसिंह भोसले यांनी दाखवलेली कर्तव्यनिष्ठा सल्युट करावी अशी. माझ्यापेक्षा वयाने लहान असलेला हा आत्येभाऊ आपल्या कर्तव्यनिष्ठेने खूप मोठा ठरला आहे. राष्ट्रीय आपत्तीला सामोरे जाताना त्याने दाखवलेले धैर्य, निष्ठा वाया जाऊ देऊ नका. पोलीस आणि आरोग्य विभाग जीवाची पर्वा न करता जनतेच्या सुरक्षिततेसाठी कसं कार्यरत आहे, याचं प्रातिनिधिक उदाहरण म्हणजे माझ्या या आत्येभावाची वर्तणूक. अधिक काय बोलू?देशसेवा करत असताना कुटुंबातलं दु:ख बाजूला सारून अभयसिंह यांनी कर्तव्याला प्राधान्य दिलं. उंब्रज पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या अभयसिंग यांच्या या कार्याला लोक सॅल्युट करत आहेत. हे वाचा : देशात Covid-19 च्या रुग्णांसाठी पहिलं स्वतंत्र हॉस्पिटल सज्ज; रिसायन्स इंडस्ट्री
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus