कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, बीड जिल्ह्यातील 5 महत्त्वाची शहरं 10 दिवसांसाठी लॉकडाऊन

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, बीड जिल्ह्यातील 5 महत्त्वाची शहरं 10 दिवसांसाठी लॉकडाऊन

जिल्ह्यातील पाच शहरांमध्ये 10 दिवसांसाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.

  • Share this:

बीड, 9 ऑगस्ट : महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा कहर वाढू लागला आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. बीडमध्येही कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्ह्यातील पाच शहरांमध्ये 10 दिवसांसाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. रुग्णवाढीचा दर कमी करण्यासाठी प्रशासनाकडून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

बीड, परळी, अंबाजोगाई, आष्टी, केज ही शहरे 12 ऑगस्ट पासून 21 ऑगस्टपर्यंत पूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी माहिती दिली आहे. रॅपिड अँटिजेन टेस्ट पूर्ण झाल्यावर पाच शहरे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळालं.

बीड शहरातील अँटीजन टेस्टमध्ये पहिल्याच दिवशी- 86 नव्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. एकाच दिवसात तब्बल 203 नवे कोरोना बाधित आढळले. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा हा 1670 झाला आहे. रॅपिड अँटिजेन टेस्ट शिवाय दुकान उघडण्यास परवानगी नाही, असाही निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला होता.

दरम्यान, बीडमध्ये काल दिवसभरात 3 कोरोना बाधित व्यक्तींचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्हयात कोरोनामुळे झालेल्या एकूण मृतांचा आकडा 52 वर पोहोचला आहे.

लॉकडाऊन हा शब्द कचऱ्याच्या पेटीत टाकूया, असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. मात्र कोरोनाची स्थिती पाहून हतबल झालेल्या स्थानिक प्रशासनाकडून वारंवार लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात येत आहे. त्यामुळे कोरोनावर लॉकडाऊन हाच अंतिम उपाय प्रशासनासमोर आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Published by: Akshay Shitole
First published: August 9, 2020, 5:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading