कल्याण, 7 डिसेंबर : राज्यातील पहिला ओमायक्रॉनचा रुग्ण कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील डोंबिवली शहरात (Omicron affected in Kalyan Dombivli) आढळला आणि एकच खळबळ उडाली. हे काय कमी होतं ते आता परदेशातून विशेष करून हायरिस्क देशातून आलेले प्रवासी एकामागोमाग एक करोना बाधित आढळत आहेत. याच दरम्यान आता कल्याण डोंबिवलीतून चिंता वाढवणारी बातमी आली आहे. परदेशातून कल्याण-डोंबिवलीत आलेल्यांपैकी 12 जण बेपत्ता असून त्यांचा संपर्कच होत नसल्याचं समोर आलं आहे. (12 foreign returnee untraceable who reached Kalyan Dombivli from high risk countries)
12 प्रवाशांचा संपर्कच नाही
यामुळे कल्याण-डोंबिवली शहरांना पुन्हा एकदा करोनाचा धोका वाढला असून हायरिस्क देशातून जास्त प्रवासी या दोन्ही शहरात आली असल्याने ओमायक्रॉनचा धोकादेखील या शहरांना निर्माण झालेला आहे. कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेने दिलेल्या ताज्या माहितीनुसार आत्तापर्यंत परदेशातून 318 नागरिक कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेतात आलेले आहेत. त्यापैकी 306 नागरिकांची ओळख पटली असून अजूनही 12 नागरिक हे पूर्णतः कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या संपर्कात नाहीयेत.
वाचा : Genome Sequencing | नव्या व्हेरियंटचा शोध कसा लावतात? जीनोम सीक्वेन्सिंग म्हणजे काय? जाणून घ्या
स्वॅब जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले
या 12 प्रवाशांपैकी अनेकांचे पत्ते अपूर्ण आहेत, अनेकांचे मोबाईल फोन बंद आहेत आणि त्यांची घरे बंद आहेत. यामुळे यांच्याशी संपर्क करणे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेला अडचणीचं होतं आहे. तर हायरिस्क देशातून आलेले प्रवासी कारोना बाधित होण्याची संख्या वाढली असून दक्षिण आफ्रिकेवरून आलेला प्रवाशी ओमायक्रोन बाधित आढळला आहे. तर नायजेरिया या देशातून आलेले चार प्रवासी देखील करोना बाधित आढळले होते. त्यात आता दुबईतून आलेले दोन प्रवासी देखील करोनाबाधित आढळले आहेत. यामुळे आता या सर्व रुग्णांचे स्वॅब जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आलेत.
वाचा : ओमिक्रॉन धोकादायक आहे की नाही? तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे
ओमायक्रोन धोका
कोरोना बाधितांच्या जिनोम सिक्वेन्सिंगच्या चाचणीचा अहवाल आल्यानंतरच हायरिस्क देशातून आलेले प्रवासी ओमायक्रोन बाधित आहेत की नाहीत हे स्पष्ट होईल. पण एकंदर हायरिस्क देशातून कल्याण-डोंबिवली शहरात आलेल्या नागरिकांची संख्या पाहता आणि त्यांचा कल्याण डोंबिवली शहरात झालेला वावर पाहता कल्याण-डोंबिवली शहराला ओमायक्रोन धोका वाढलेला आहे असं दिसतंय.
या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेने युद्धपातळीवर तयारी सुरू केली असून हायरिस्क देशातून येणाऱ्या प्रवाशांची माहिती तात्काळ गोळा करून त्यांना स्वतंत्र क्वारनटाईन केलं जाईल अशी यंत्रणा कल्याण डोंबिवली महानगरपालिका तयार करत आहे. शिवाय कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत मास्क वापरणे सक्तीचे केले असून कोणत्याही कार्यक्रमास 25 टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती आढळल्यास संबंधित कार्यक्रम आयोजकांवर कठोर कारवाई केली जाईल असे स्पष्ट संकेत कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेने दिलेले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Dombivali, Kalyan