Coronavirus : महाराष्ट्रातील दिवसभराचे अपडेट्स आणि सरकारचे महत्त्वपूर्ण निर्णय फक्त एका क्लिकवर

Coronavirus : महाराष्ट्रातील दिवसभराचे अपडेट्स आणि सरकारचे महत्त्वपूर्ण निर्णय फक्त एका क्लिकवर

गरज पडल्यास खाजगी रूग्णालयाकडून व्हेंटिलेटर घेण्यात येतील, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

  • Share this:

मुंबई, 15 मार्च : करोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कोवीड -19 उपाययोजना अधिसूचना लागू झाल्याने आवश्यकता भासल्यास विलगीकरणासाठी खाजगी रुग्णालयातील बेडस् अधिग्रहित करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

मुंबई येथील कस्तुरबा गांधी रूग्णालयाच्या प्रयोगशाळेमध्ये चाचण्यांची संख्या वाढवण्यासाठी बुधवारपासून यंत्रणा कार्यान्वित होणार असून येथे दिवसाला 350 चाचण्या करता येतील. यासोबतच के.ई.एम. रुग्णालयात दिवसाला 250 चाचण्या होतील अशी यंत्रणा सुरु करण्यात येणार आहे. सोबतच 15 ते 20 दिवसात जे.जे. रुग्णालय, हाफकिन इन्स्टिट्यूट आणि पुणे येथील बीजे महाविद्यालयात चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

कोरोना संशयितांसाठी कुठे-कुठे होणार चाचणी?

राज्यातील शाळा, महाविद्यालये, मॉल यासोबत आता पुरातन वस्तू संग्रहालये बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा 31 मार्चपर्यंत पुढे ढकलाव्यात, असे आयोगाला कळविण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात सध्या 33 रूग्ण आढळून आले आहेत. संशयित रूग्णांच्या चाचण्यांसाठी येत्या काही दिवसात राज्यभरातील धुळे, औरंगाबाद, मिरज, सोलापूर या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रयोगशाळा सुरू करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

यासंदर्भात अधिक माहिती देताना आरोग्यमंत्री म्हणाले की, नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि संसर्ग टाळण्याकरता राज्य शासनाच्या माध्यमातून पुरेशी खबरदारीचे उपाय घेण्यात येत आहेत. गरजेनुसार प्रवास करण्याचे आणि अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन वारंवार नागरिकांना केले जात आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि सार्वजनिक ठिकाणी निजर्तुंकीकरण करण्याकरिता संबंधित यंत्रणांना सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यामध्ये आवश्यकता भासल्यास कोरोनाच्या रूग्णांवर उपचारासाठी 450 व्हेंटिलेटर स्वतंत्ररित्या ठेवण्यात आले आहेत. गरज पडल्यास खाजगी रूग्णालयाकडून व्हेंटिलेटर घेण्यात येतील, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

हेही वाचा- शासनाच्या आदेशाला केराची टोपली, कोरोना संसर्गाला जणू खुले आमंत्रण

काल रात्री पिंपरी चिंचवड येथील 5 आणि आज सकाळी औरंगाबाद येथील 1 रुग्ण कोरोनाबाधित आला. तसंच सायंकाळी पिंपरी चिंचवडमधीलही एका रुग्णाला कोरोनाची बाधा झाल्याने राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 33 झाली असून औरंगाबाद मधील रुग्णालयात भरती असलेल्या 59 वर्षीय महिलेने रशिया आणि कझाकिस्तान येथे प्रवास केलेला आहे. तिची प्रकृती स्थिर आहे.

राज्यात आज 95 संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे. 15 मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर 1 हजार 584 विमानांमधील 1 लाख 81 हजार 925 प्रवासी तपासण्यात आले आहेत.

राज्यात आजपर्यंत बाधित भागातून एकुण 1043 प्रवासी आले आहेत. 18 जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत 759 जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी 669 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 33 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यातील विविध विलगीकरण कक्षामध्ये 75 संशयित रुग्ण भरती आहेत.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय कोरोनाबाधित रुग्णांचा तपशील असा –

पिंपरी चिंचवड मनपा - 9 रूग्ण, पुणे - 7, मुंबई - 5, नागपूर - 4, यवतमाळ - 2, रायगड, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, औरंगाबाद, अहमदनगर प्रत्येकी एक असे एकूण 33 रूग्ण आहेत.

First published: March 15, 2020, 10:06 PM IST

ताज्या बातम्या