नाशिक, 24 मार्च : संचारबंदीतही काहीजण विनाकारण रस्त्यावर उतरताना दिसत आहेत. अशा लोकांना वठणीवर आणण्यासाठी नाशिकमध्ये पोलीस रस्त्यावर उतरले आहेत. जो विनाकारण फिरताना दिसेल त्याला पोलिसांकडून लाठीचा प्रसाद देण्यात येत आहे.
नाशिकमध्ये कलम 144 च्या कडक अंमलबजावसाठी पोलीस आक्रमक झाले आहेत. मात्र तरीही नागरिक काही ऐकायला तयार नाहीत, असं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांन इशारा दिला आहे. '144 कलम पाळा, हे सगळ्यांसाठी आवश्यक आहे. फक्त अत्यावश्यक सेवांना यातून दिलासा आहे. घातलेले निर्बंध न पाळणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करणार,' असं विश्वास नांगरे पाटील म्हणाले.
'पोलिसांना संपूर्ण स्वातंत्र्य; नागरिकांनी घरी बसून सहकार्य करावे'
‘कोरोना’च्या संसर्ग प्रतिबंधासाठी लागू केलेल्या राज्य प्रवेशबंदी, जिल्हा प्रवेशबंदी आणि संचारबंदीसारख्या निर्णयांची अंमलबजावणी राज्यात कठोरपणे करण्यात येईल, त्यासाठी पोलिसांना कारवाईचे संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
भाजीपाला, फळे, दूध, अन्नधान्य आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कायमस्वरुपी सुरळीत ठेवण्यात येणार असल्याने नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी करु नये. ‘कोरोना’च्या धोक्यापासून दूर राहण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकांची स्वत:ची असून त्याप्रमाणे त्यांनी वर्तन ठेवावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.
हेही वाचा- कोरोनाच्या लढाईत पोलीस पत्नींही पाठिशी, सरकारकडून दिरंगाई होत असल्याने एका दिवसांत शिवले 500 मास्क
राज्यात संचारबंदी लागू असतानाही काही नागरिकांकडून बाजारात खरेदीसाठी गर्दी केली जात आहे. नागरिक अकारण गाड्या घेऊन रस्त्यावर उतरत आहेत. ‘कोरोना’च्या संसर्गाचा धोका वाढत आहे. राज्यशासनाचा आरोग्य विभाग, पोलिस विभाग, महापालिका, नगरपालिकांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे, प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी सर्वजण जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य पार पाडत आहेत. राज्याच्या प्रत्येक घरातला माणूस ‘कोरोना’च्या संसर्गापासून मुक्त रहावा यासाठी ते धोका पत्करत असताना, जनतेनेही संयम पाळून शासनाच्या प्रयत्नांना साथ द्यावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.