बीड, 3 एप्रिल : देशभर सुरू असलेल्या संचारबंदीमुळे बीड जिल्ह्यातीलही सर्वच बाजारपेठांमध्ये कडकडीत बंद आहेत. याचाच फायदा घेत चोरटे सक्रीय झाल्याचे दिसत आहे. बीड शहरातील बलभीम चौकातील न्यू मराठवाडा इलेक्ट्रॉनिक वस्तूचे दुकान फोडून रोख रकमेसह दोन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
मध्यरात्रीच्या सुमारास दोन चोरट्यांनी दुकानाच्या छतावरून दुकानात प्रवेश केला. यावेळी दुकानातील काउंटरमधून रोख रक्कम आणि दुकानातील महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तू लंपास केल्या. चोरट्यांची ही कृष्ण लीला सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. चोरी झाल्याचे समजताच दुकान मालकाने बीड शहर पोलिसांशी संपर्क साधला पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
संचार बंदीच्या काळात सर्वच दुकाने बंद आहेत आणि अशातच चोरटे सक्रिय झाल्यामुळे व्यापारी वर्गात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे असे प्रकार पुन्हा घडू न देण्याचं आणि दुकानदार वर्गातील भीती दूर करण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.
दरम्यान, जगभर धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरसचा विळखा भारतात घट्ट होऊ नये, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मात्र देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या कालावधीत वाढ होणार का, याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.
एकीकडे, लॉकडाऊनमध्ये वाढ होणार असल्याची चर्चा रंगत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन कसा आणि कधी संपवता येईल, याबाबतचा मार्ग काढण्याच्या सूचना दिल्या आहेत.