• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • जिवंत काकीला पांंढऱ्या कपड्यात गुंडाळलं, मुंबईतील तरुणांची कोकणात जाण्यासाठी धडपड

जिवंत काकीला पांंढऱ्या कपड्यात गुंडाळलं, मुंबईतील तरुणांची कोकणात जाण्यासाठी धडपड

मुंबई येथील दोन तरुणांचा धूळफेक करण्याचा प्रयत्न रत्नागिरी पोलिसांनी मोडून काढला आहे.

  • Share this:
रत्नागिरी, 4 एप्रिल : कोरोनाचा संसर्ग वाढू नये, म्हणून देशासह राज्यातही संचारबंदी करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मनाई आदेश असल्याने गावी जाण्यासाठी चक्क आपल्या जिवंत काकीला मरणाचे नाटक करायला लावणाऱ्या मुंबई येथील दोन तरुणांचा धूळफेक करण्याचा प्रयत्न रत्नागिरी पोलिसांनी मोडून काढला आहे. संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. जिल्ह्याच्या , गावच्या सीमा देखील बंद आहेत, मात्र काहीही करून गावी जायचं म्हणून मुंबईतील दोन तरुणांनी एक वेगळीच शक्कल लढवली. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील आपली काकी मयत झाली आहे, असे सांगून तसेच पोलिसांपुढे हातापाया पडून विनवणी करून नाकाबंदीतून निसटण्याची या दोन तरुणांची युक्ती रत्नागिरी जिल्ह्यातील खेड पोलिसांमुळे उघड झाली आहे. भरणे नाका येथील नाकाबंदीत या दोन तरुणांना पोलिसांनी अडवलं. ठरल्या प्रमाणे दोघांनी काकीच्या निधनाचे कारण सांगून पोलिसांना विनवणी करायला सुरुवात केली. त्यावेळी कर्तव्यावर असणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांना शंका आली. खात्री करण्यासाठी त्यांनी घरी व्हिडिओ कॉल करण्यास सांगितला. संबंधित तरुणांच्या घरच्यांनी देखील काय करायचं हे देखील आधीच ठरलं होतं. त्या तरुणांच्या काकीने पांढऱ्या कापडाने अंगावर लपेटून घेत जिवंतपणी मेल्याचे सोंग घेत पोलिसांना चकवण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही पोलिसांना काहीतरी वेगळं वाटलं म्हणून त्या गावच्या पोलीस पाटलाला खात्री करण्यास सांगितलं. काही वेळातच त्यांचं भांड फुटलं त्या दोन तरुणांना पोलिसांच्या नाकाबंदीतून गावाकडे येण्यासाठी हा ठरलेला बनाव असल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्या दोन तरुणांची दुचाकी जप्त केली असून त्यांना खेडमध्येच क्वारन्टाइन करून ठेवण्यात आले आहे. हेही वाचा-विदर्भात कोरोनाने घेतला 2 बळी, राज्यात मृतांची संख्या 21 वर मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने घाबरलेल्या कोकणातील लोकांनी गावाकडे धाव घेतली आहे. जिथे आहात तिथेच सुरक्षित राहा असे आवाहन करूनदेखील लोक घराबाहेर पडत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सगळीकडे लॉक डाऊन असताना काही लोक रेल्वे ट्रॅक चा वापर करताना दिसत आहेत, तर काही लोक वेगवेगळ्या युक्त्या करून पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करत जिल्ह्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत.
Published by:Akshay Shitole
First published: