पंढरपूर, 15 एप्रिल : लॉकडाऊनमुळे गेल्या 50 दिवसांपेक्षा अधिक काळ दारुची दुकाने बंद असल्याने मद्यप्रेमींची चांगलीच तडफड होत आहे. दारुची दुकाने कधी उघडतात याकडे डोळे लावून बसलेल्या मदयप्रेमींची फसवणूक होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशातच ऑनलाइन दारु विक्रीला परवानगी दिल्याचा निर्णय झाल्यानंतर पंढरपुरातील रॉय वाईन्सच्या नावाने फेसबुकवर अकाऊंट काढून दारु घरपोच करण्याचे आश्वासन देत मद्यप्रेमींची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
कोरोना विषाणुचा फैलाव रोखण्यासाठी गेले अनेक दिवस दारुची दुकाने बंद आहेत. लवकरच ही दुकाने उघडण्यात येतील, अशा बातम्या प्रसारीत झाल्याने मद्यप्रेमींच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी ही दुकाने 17 मे पर्यंत उघडणार नसल्याचे स्पष्ट केलं. दारु दुकानात होणारी गर्दी टाळण्यासाठी ऑनलाईन दारु विक्रीस राज्य उत्पादन शुल्क आयुक्त यांनी परवानगी दिली असल्याचे वृत्त प्रसारीत झाले. त्यानंतर पंढरपुरातील अनेकांच्या फेसबुक वॉलवर रॉय वाईन शॉप होम डिलीव्हरी असे एक पेज दिसू लागले.
पंढरपुरातील अनेकांनी या पेजला लाईक केलं आहेत. तर काही उत्साही मंडळींनी दारु घरपोहोच मिळेल म्हणून पैसेही पाठवले. मात्र दारु तर मिळालीच नाही, उलट आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. पैसे तर गेलेच आता अब्रु जायला नको म्हणून हे तळीराम आता पुढे येत नाहीत. याबाबत रॉय वाईन शॉपचे मोतीराम संतानी व गोसावी वाईन शॉपचे मुन्नागिर गोसावी यांनी देखील अशा फसवणुकी पासून सावध राहण्याचे अवाहन केले आहे.
दारु घर पोहोच मिळण्यासाठी या पेजवर दोन मोबाईल नंबर दिले आहेत. त्या नंबरवर फोन केला असता समोरची व्यक्ती सराईत पणे हिंदीतून बोलत आहे. तसंच आपला पत्ता सांगा, आम्ही आपल्याला घरपोच दारू पाठवू, असं सांगत आहे. त्यानंतर पुन्हा वारंवार पैसे पाठविण्यास सांगितले जाते.
ट्रुकॉलरवर या नंबरची तपासणी केली असता आसाम राज्यातील राजकुमार व गुल्लू सरमा या नावाने हे मोबाईल असल्याचे दाखवले जात आहे.
'रॉय वाईन शॉपचे कोणतेही फेसबुक अकाऊंट नाही, तसेच शासनाच्या आदेशानुसार दुकान उघडण्यास अद्याप परवानगी नाही. होम डिलीव्हरी वगैरे काहीही दिली जात नाही. आमच्या नावाने फेसबुक अकाऊंट काढून फसवणूक केली जात असल्याचे आमच्या निदर्शनास आले असून आम्ही याबाबत उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांकडे रितसर लेखी तक्रार दाखल केलेली आहे. तरी कोणीही दारुची होम डिलीव्हरी या नावाने पैसे पाठवू नयेत व फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी,' असं आवाहन रॉय वाईन शॉपचे मालक मोतीराम संतानी यांनी केलं आहे.
संपादन - अक्षय शितोळे